मुंबई
narayani shastri ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘पिया का घर’ आणि ‘कुसुम’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोरंजनसृष्टीबाबत काही धक्कादायक दावे केले आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार ड्रग्जचे सेवन करतात, असा दावा तिने केला असून, मात्र यावेळी तिने कोणत्याही विशिष्ट कलाकाराचे नाव घेण्याचे टाळले. मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या बहुतांश लोकांसाठी ड्रग्जचे सेवन ही अत्यंत सामान्य बाब असल्याचेही तिने नमूद केले. तसेच अनेक सेलिब्रिटींना पार्ट्यांमध्ये स्वतःच्या डोळ्यांनी ड्रग्ज घेताना पाहिल्याचा दावा करत तिने स्वतःही आयुष्यात ड्रग्जचे सेवन करून पाहिल्याची कबुली दिली.
नारायणी म्हणाली की, पूर्वी मनोरंजनसृष्टीतील पार्ट्यांमध्ये दारूसाठी स्वतंत्र बजेट निश्चित केले जात असे; मात्र आता त्या ठिकाणी बेकायदेशीर ड्रग्जसाठीही स्वतंत्र बजेट ठेवले जाते. हा बदल पाहून स्वतःला मोठा धक्का बसल्याचे सांगत तिने अनेक वर्षांपूर्वीच अशा पार्ट्यांना जाणे बंद केल्याचे स्पष्ट केले. तिच्या मते, आता अशा पार्ट्यांमध्ये पूर्वीसारखी नृत्य, मनोरंजन किंवा मजामस्ती होत नाही; त्याऐवजी वेगळ्याच प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात. तथापि, मोठ्या पार्ट्यांमध्ये हे प्रकार उघडपणे घडत नसल्याचेही तिने सांगितले. ड्रग्जचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना आपण वैयक्तिकरित्या ओळखत नसल्याचे स्पष्ट करताना, अनेकांना प्रत्यक्ष ड्रग्ज घेताना पाहिल्याचा पुनरुच्चारही तिने केला.
मुलाखतीदरम्यान पार्ट्यांमध्ये कोणत्या प्रकारची ड्रग्ज वापरली जातात, असा प्रश्न विचारण्यात आला असता नारायणीने कोकेन आणि एमडीएमएचा उल्लेख केला. आयुष्यात सर्व प्रकारच्या गोष्टी करून पाहिल्याचे सांगताना, त्या केवळ त्यांचा परिणाम काय होतो आणि त्या कशा प्रकारे कार्य करतात, हे जाणून घेण्याच्या उद्देशानेच एकदाच वापरल्याचा दावा तिने केला. स्वतःला कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागले नसल्याचे स्पष्ट करत, प्रत्येक प्रकारचे ड्रग्ज फक्त एकदाच सेवन करून पाहिल्याचे ती म्हणाली. तसेच आयुष्यात एकदाच मद्यपान केल्याचे सांगत, जर कोणी आपल्या पेयामध्ये काही मिसळले तर त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेण्यासाठीच हा अनुभव घेतल्याचेही तिने नमूद केले.कलाकार शूटिंगच्या सेटवरही ड्रग्जचे सेवन करतात का, असा प्रश्न विचारण्यात आला असता नारायणीने होकारार्थी उत्तर दिले. असे प्रकार वारंवार घडत असल्याचा दावा करताना ती म्हणाली की, अनेकदा कलाकार शूटिंग करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे चित्रीकरण रद्द करावे लागायचे. अशा वेळी संपूर्ण युनिट चार-चार तास कलाकारांची वाट पाहत बसत असे. ड्रग्जचे सेवन केल्यानंतर काही कलाकारांना नीट उभे राहणेही शक्य होत नसे, असा गंभीर दावा करत हे प्रकार अनेकदा अनुभवास आल्याचेही नारायणी शास्त्रीने सांगितले.