प्रत्येक तालुयात पर्यटनाची बलस्थाने; प्रभावी प्रसिद्धीतून पर्यटक वाढवा

पर्यटन विकासासाठी स्टेकहोल्डर्स उद्योजकांची कार्यशाळा उत्साहात

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
वाशीम,
washim tourism जिल्ह्यातील प्रत्येक तालुयात पर्यटनाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण बलस्थाने असून, धार्मिक, नैसर्गिक, वन, ग्रामीण आणि कृषी पर्यटनाची मोठी क्षमता जिल्ह्यात उपलब्ध आहे. या पर्यटन स्थळांचा राज्यासह देशभरात प्रभावी प्रचार-प्रसार करून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करणे आवश्यक आहे. पर्यटन स्थळांची माहिती विविध माध्यमांतून व्यापकपणे पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित विभाग, टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स संस्था आणि हॉटेल उद्योजकांनी समन्वयाने कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 

washim tourism development plan to promote religious, nature and rural tourism destinations 
महास्ट्राइड प्रकल्पांतर्गत नियोजन विभागाच्या जिल्हा विकास आराखडा (डिस्ट्रिट स्ट्रॅटेजिक प्लॅन) २०३० नुसार महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीत पर्यटन क्षेत्राची भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक व हॉटेल उद्योजकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील, उपवनसंरक्षक माधवराज, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, मृत्यूंजय मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित स्टेकहोल्डर्स यांनी पोहरादेवी, गुरु मंदिर, शिरपूर येथील जैन मंदिर, कारंजा येथील धार्मिक स्थळे, काटेपूर्णा वन्यजीव परिसर, एकबुर्जी धरण, बालाजी मंदिर—पद्मतीर्थ, कृषी पर्यटन केंद्रे तसेच ग्रामीण पर्यटन स्थळांचा समावेश असलेला पर्यटन परिपथ विकसित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी दर्जेदार रस्ते, स्वच्छता, माहिती फलक, सुरक्षितता, निवास व भोजन व्यवस्था, वाहतूक सुविधा आणि डिजिटल माध्यमातून प्रभावी प्रसिद्धी यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग, पर्यटनावर आधारित उद्योजकता, स्थानिक युवकांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण, ग्रामीण व कृषी पर्यटनाला चालना, स्थानिक रोजगारनिर्मिती तसेच पर्यटन विकासासाठी विभागनिहाय समन्वय वाढविण्याबाबत चर्चा झाली. टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक व हॉटेल उद्योजकांनीही पर्यटकांच्या सोयी-सुविधा, पायाभूत सुविधा आणि पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना मांडल्या. कार्यशाळेस पर्यटन क्षेत्राशी संबंधित अधिकारी, टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक, हॉटेल उद्योजक तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................