फडणवीस दिल्लीला जाणार की महाराष्ट्रातच राहणार? अमृता फडणवीसांचे स्पष्ट उत्तर

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
पंढरपूर,
amruta fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्व दिल्लीत बोलावून घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देऊन केंद्रीय मंत्री केले जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
 
 

amruta fadnavis
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पहाटे पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ‘नाही, आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे. मला देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवायचे आहे,’ असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य जबाबदारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.
यावेळी अमृता फडणवीस यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. नीट परीक्षेतील पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन असेल, तर त्यांची भूमिका योग्य असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत वाया जाऊ नये आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पेपरफुटीच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये, शिक्षेत वाढ आणि इतर आवश्यक बदल करण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचेही अमृता फडणवीस यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना भविष्यात पेपरफुटीचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत मोर्चा काढणार असल्याबाबतही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ते दोघे एकत्र येऊन काही करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. इतके दिवस ते वेगळे होते. त्यामुळे ही बाब सकारात्मक पद्धतीने पाहायला हवी,’ असे त्या म्हणाल्या.
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित हिंसाचारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांवर तसेच काही विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचे सांगत हा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले.amruta fadnavis आंदोलनात सहभागी मुलींशी गैरवर्तन झाले असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगत अमृता फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबतही आपली भूमिका मांडली. मात्र, या मोर्चाचा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी थेट संबंध नसून राजकीय पटलावर आपली जागा पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा तो भाग असू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी मोर्चासाठी शुभेच्छाही दिल्या.