जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यानवर येमेनचा मिसाइल हल्ला

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
जिझान,
attack on aramco सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुथी गटातील तणाव पुन्हा एकदा गंभीर पातळीवर पोहोचला आहे. येमेनकडून सौदी अरेबियाला लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या अरामकोच्या तेल सुविधेलाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
 
attack on aramco
 
या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियातील जिझान औद्योगिक शहरात मोठी खळबळ उडाली. परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आले असून, एका महत्त्वाच्या औद्योगिक सुविधेला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याचेही समोर आले आहे.
अरब सूत्रांच्या माहितीनुसार, येमेनकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचा परिणाम जिझान, यान्बू आणि दमाद परिसरावर झाला. परिस्थिती लक्षात घेता सौदी नागरी संरक्षण दलाने यान्बू प्रांतासाठी राष्ट्रीय पूर्वसूचना मंचावर आपत्कालीन इशारा जारी केला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या प्रादेशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुथी गटातील तणाव अधिकच वाढला आहे. शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाने येमेनमधील हुथींच्या नियंत्रणाखालील होदेदाह शहरावर हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला.
या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा हुथी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. सौदी अरेबियाला या कारवाईची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा देण्यात आला. हुथींशी संबंधित अल-मसीरा टीव्हीच्या वृत्तानुसार, होदेदाहमधील दूरसंचार प्राधिकरणाच्या सुविधांना लक्ष्य करण्यात आले. तसेच कमर बेटावरही हल्ला झाल्याचे सांगण्यात आले असून, या घटनेत एक महिला जखमी झाल्याची माहिती आहे.
यापूर्वी बुधवारी हुथींनी लाल समुद्रातील सौदी तेलवाहू जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केल्याचा दावा केला होता. या कारवाईत किमान एका जहाजाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.attack on aramco २० जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या नाकेबंदीचा हा भाग असल्याचे हुथी गटाने म्हटले आहे. सना विमानतळावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
सौदी-समर्थित सरकारने सना विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. २०२२ पासून दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेली अनौपचारिक शांतता आता धोक्यात आल्याचे दिसत आहे. सौदी अरेबिया आणि हुथी गटातील संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता वाढल्याने लाल समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गावरून होणाऱ्या जागतिक व्यापाराबाबतही चिंता निर्माण झाली आहे.