जि.प. कर्मचाऱ्यांना सायबर फ्रॉडचा फटका

ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
लाखो रुपये फसवणूक
 
 
नागपूर, 
zilla parishad राज्यासह नागपूर जिल्ह्यात ऑनलाईन गुंतवणुकीवर अल्पावधीत दुप्पट किंवा अनेक पटीने परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. याच प्रकारे नागपूर जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचाऱ्यांची मत्स्य व्यवसायातील बनावट ऑनलाईन गुंतवणूक योजनेत अडकून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केला आहे.
 
 
cyber-fraud
 
मिळालेल्या माहितीनुसार, मत्स्य व्यवसाय अर्थात फिशरीज क्षेत्रात कमी कालावधीत दुप्पट नफा मिळेल, असे आमिष दाखवून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात काही गुंतवणूकदारांना किरकोळ परतावा दिल्याने विश्वास बसला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले गेले. मात्र, काही दिवसांनी परतावा पूर्णपणे बंद झाला आणि संबंधित एजंट/कंपनीने संपर्कही तोडला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी मूळ रक्कम परत मिळवण्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न केले. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही पीडित कर्मचाऱ्यांनी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेकडे व्यथा मांडली आहे.
 
 
डॉ. सोहन चवरे यांनी सांगितले की, ‘बदनामीच्या भीतीने किंवा संकोचामुळे अनेक कर्मचारी अजूनही अधिकृत तक्रार करत नाहीत. मात्र, वेळ न दवडता सर्व पुराव्यांसह सायबर गुन्हे शाखा किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करावी. तपासाद्वारे गुंतवलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे आणि आरोपींवर कायदेशीर कारवाई होऊन भविष्यात इतर कर्मचारी व नागरिक अशा फसवणुकीपासून सावध राहतील.
 
नागपूरमधील मोठा घोटाळा
दरम्यान, नागपुरात फॉर्च्युन फिशरीज, व्हिजन फिशरीज आणि फॉर्च्युन ॲक्वा या नावाच्या योजनांमध्ये गुंतवणूकदारांची सुमारे १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात धंतोलीतील व्यावसायिक राजेश ताराचंद बनसोड याचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी जमा करण्यात आलेली ६२ लाख रुपये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीचे स्वरूपही याच प्रकाराशी साधर्म्य दर्शवित असल्याचे डॉ. चवरे यांनी नमूद केले.
 
 
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने सर्व फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की, आपल्याकडील व्यवहाराची कागदपत्रे, ऑनलाईन पेमेंटचे स्क्रीनशॉट, बँक व्यवहारांची माहिती आणि संबंधित व्यक्तींशी झालेले संभाषण यासह तातडीने सायबर गुन्हे शाखा किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल करावी.