४०० वर्षे जुनी तोफ चोरीला; हिंडौन कनेक्शनने उलगडले गूढ!

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
शिवपुरी,
cannon-stolen : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नरवर गडावरून ३.५ टन वजनाची आणि सुमारे ४०० वर्षे जुनी प्राचीन तोफ चोरीला गेल्याच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. या धाडसी चोरीचे धागेदोर राजस्थानमधील करौली जिल्ह्याशी जोडले गेले असून पोलीस तपासाला वेग आला आहे.
 
 
cannon-stolen
 
 
 
राजस्थानमधून दोघांना घेतले ताब्यात
 
पोलीस सूत्रांनुसार, तांत्रिक तपासाच्या आधारे या तपासाची चक्रे राजस्थानमधील हिंडौन परिसरातील गावडा मीना गावापर्यंत पोहोचली. मध्य प्रदेश आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टिम्मू राम मीना आणि अमन मीना या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना शिवपुरी येथे नेण्यात आले असून, एक मालवाहू गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे.
 
मातीच्या ढिगाऱ्यांची उत्खनन यंत्रांच्या साह्याने पाहणी
 
संशयित ठिकाणी तोफ लपवून ठेवल्याच्या शंकेवरून पोलिसांनी गावडा मीना परिसरातील काही जागा निश्चित करून तिथे उत्खनन यंत्रांच्या साह्याने शोधमोहीम सुरू केली आहे. कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप देऊन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
 
१५ जुलैच्या मध्यरात्री नरवर गडाच्या कचेरी महालातून साडेतीन टन वजनाची ही प्राचीन तोफ चोरीला गेली होती. गडाचे रक्षक रमेश कोली यांनी १७ जुलै रोजी नरवर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ही तोफ शिंदे (सिंदिया) संस्थानाच्या काळातील असून तिचे वजन ३ ते ३.५ टन आहे. आंतरराष्ट्रीय दुर्मिळ वस्तूंच्या बाजारात याची किंमत सुमारे ५ कोटी रुपये असू शकते. या तोफेवर शिंदे संस्थानाचे राजचिन्ह तसेच देवनागरी आणि फार्सी भाषेतील दुर्मिळ शिलालेख कोरलेले आहेत.
 
तपास यंत्रणा या घटनेकडे केवळ साधी चोरी म्हणून न पाहता, दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा यात हात असावा या दृष्टीनेही सखोल तपास करत आहेत.