मुंबई
ipo शेअर बाजारातील आयपीओ (IPO) गुंतवणूकदारांसाठी आगामी आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात प्राथमिक बाजारात तब्बल आठ नवीन आयपीओ दाखल होणार आहेत. यामध्ये मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस आणि जुनिपर ग्रीन एनर्जी या मोठ्या मेनबोर्ड आयपीओंचा समावेश आहे. याशिवाय सहा कंपन्या एसएमई (SME) श्रेणीतील आयपीओ घेऊन येणार आहेत.
याच काळात आधीच सुरू असलेल्या चार आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. तसेच सात कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राथमिक बाजारात हालचाली वाढण्याची अपेक्षा आहे.
मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस आयपीओ
मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसचा आयपीओ २९ जुलै रोजी खुला होणार असून ३१ जुलै रोजी बंद होईल. या आयपीओसाठी किंमत पट्टा ५६० ते ५९० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये २५ शेअर्स असतील. हा ९,२७५ कोटी रुपयांचा आयपीओ असून, त्यामध्ये ८,००० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. तर १,२७५ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जातील. आयपीओ बंद झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी एनएसई आणि बीएसईवर कंपनीचे लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.
जुनिपर ग्रीन एनर्जी आयपीओ
जुनिपर ग्रीन एनर्जीचा आयपीओ ३० जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि ३ ऑगस्ट रोजी बंद होईल. कंपनीने अद्याप आयपीओचा प्राइस बँड आणि लॉट आकार जाहीर केलेला नाही. हा आयपीओ १,८०० कोटी रुपयांचा आहे.
पूजा प्रिसिजन इंजिनिअरिंग आयपीओ
पूजा प्रिसिजन इंजिनिअरिंगचा आयपीओ २८ ते ३० जुलैदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. कंपनीने प्रति शेअर २८५ ते ३०१ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा १६० कोटी रुपयांचा आयपीओ असून लॉट आकार ४०० शेअर्सचा आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान दोन लॉटसाठी अर्ज करावा लागणार आहे.
ॲडव्हान्स टेक्नोफोर्ज आयपीओ
ॲडव्हान्स टेक्नोफोर्जचा आयपीओ २७ ते २९ जुलैदरम्यान खुला होईल. या आयपीओसाठी प्रति शेअर किंमत ९५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. २४ कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १,२०० शेअर्स असतील.
प्रॉपशॉप इव्हेंट्स अँड एक्झिबिशन्स आयपीओ
प्रॉपशॉप इव्हेंट्स अँड एक्झिबिशन्सचा आयपीओ २७ ते २९ जुलैदरम्यान खुला होणार आहे. यासाठी किंमत पट्टा ६५ ते ६९ रुपये निश्चित करण्यात आला आहे. लॉट आकार २,००० शेअर्सचा असून हा २९ कोटी रुपयांचा आयपीओ आहे. यामध्ये २२ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर ६ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जाणार आहेत.
एच.आर. हायजीन प्रॉडक्ट्स आयपीओ
एच.आर. हायजीन प्रॉडक्ट्सचा आयपीओ २९ ते ३१ जुलैदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असेल. यासाठी किंमत पट्टा ८३ ते ८८ रुपये ठेवण्यात आला आहे. ५४ कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना १,६०० शेअर्सच्या लॉटमध्ये अर्ज करता येईल. कंपनीचे शेअर्स ५ ऑगस्ट रोजी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
धवल पॅकेजिंग आयपीओ
धवल पॅकेजिंगचा आयपीओ ३० जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान खुला राहील. कंपनीने प्रति शेअर ९२ ते ९७ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा ३६ कोटी रुपयांचा आयपीओ असून लॉट आकार १,२०० शेअर्सचा आहे. कंपनीचे शेअर्स ६ ऑगस्ट रोजी बीएसई एसएमईवर पदार्पण करण्याची शक्यता आहे.
फ्युजन क्लासरूम एड्युटेक आयपीओ
फ्युजन क्लासरूम एड्युटेकचा आयपीओ ३१ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान खुला होणार आहे. यासाठी किंमत पट्टा १५१ ते १५९ रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा ३९ कोटी रुपयांचा आयपीओ असून लॉट आकार ८०० शेअर्सचा आहे. कंपनीचे शेअर्स ७ ऑगस्ट रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
या कंपन्यांचे होणार शेअर बाजारात पदार्पण
आगामी आठवड्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. गल्फ लॉयड्सचे शेअर्स २७ जुलै रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. मेटॅलिक टेक्नोफोर्जचे शेअर्स २८ जुलै रोजी एनएसई एसएमईवर पदार्पण करतील. श्री बालाजी मालाचे शेअर्स २९ जुलै रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होऊ शकतात.
मेनबोर्ड विभागात लोहिया कॉर्प, इंडो-एमआयएम आणि एक्सट्रानेट टेक्नॉलॉजीज या कंपन्यांचे शेअर्स ३० जुलै रोजी एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. तर सिल्व्हरस्टॉर्म पार्क्स अँड रिसॉर्ट्सचे शेअर्स ३१ जुलै रोजी बीएसई एसएमईवर पदार्पण करू शकतात.
एकूणच, नवीन आठवड्यात आयपीओ बाजारात मोठी उलाढाल होणार असून, मोठ्या कंपन्यांपासून ते एसएमई क्षेत्रातील नव्या कंपन्यांपर्यंत गुंतवणूकदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.