चंद्रपूर,
abduction-of-a-female-student : शहरातील लालपेठ परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला कथितपणे फूस लावून घरात डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनी शाळेत जात असल्याचे सांगून घरातून निघाल्यानंतर बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर ती एका तरुणाच्या घरात आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध अपहरण, बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे, मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.
लालपेठ येथील 14 वर्षीय विद्यार्थिनी 24 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजता सायकलने शाळेसाठी घरातून निघाली होती. मात्र सायंकाळी नेहमीच्या वेळेत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शाळेत संपर्क साधला असता, संबंधित विद्यार्थिनी त्या दिवशी शाळेतच पोहोचली नसल्याचे समोर आले. यानंतर विद्यार्थिनीच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता, ती सोनचाफा मंदिरापर्यंत सोबत आली होती. त्यानंतर ती राजीव नगर येथील लोकेश चव्हाण याच्यासोबत गेल्याचे मैत्रिणीने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही माहिती मिळताच, विद्यार्थिनीची आई, बहिणी आणि भाऊ संबंधित तरुणाच्या राहत्या घरी पोहोचले. तेथे विद्यार्थिनीची सायकल घराच्या अंगणात उभी असल्याचे दिसून आले. घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला असता, विद्यार्थिनीने घराच्या आतून आवाज दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी संबंधित तरुण तेथे आला. दरवाजा उघडल्यानंतर विद्यार्थिनी घरात आढळून आली. तक्रारीनुसार, विद्यार्थिनीने संबंधित तरुणाने तिला फूस लावून घरात आणले व डांबून ठेवल्याचे आपल्या आईला सांगितले. यावेळी विद्यार्थिनीच्या मोठ्या बहिणीने आरोपीला जाब विचारला असता, त्याने तिला मारहाण केली. तसेच कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृणाल रामटेके करीत आहे