वाशीम,
crime-news : सन २०१० मधील बहुचर्चित खून प्रकरणातील पसार आरोपी आशाबाई ऊर्फ आशा संतोष थोरात हिला वाशीम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जुलै २०२६ रोजी लोणावळा येथून अटक केली. गेली १५ वर्षे ती पोलिसांना गुंगारा देत होती. यापूर्वी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज वाशीम अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.

वाशीम शहर पोलिस ठाण्यात सन २०१० मध्ये अनिल सोपान मनोहर यांनी तक्रार दाखल केली होती. मृतक सुनील याने एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या संशयातून आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी पाइप आणि चाकूने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात भादंवि कलम ३०२, ३०७ आणि ३४ अन्वये वाढीव कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी आशाबाई पसार होती. आरोपीचे वकील यांनी आशाबाईचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचा युक्तिवाद करत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. मात्र, सरकारी वकील गिमेकर यांनी विरोध करत, आरोपी घटनेच्या दिवसापासून पसार असल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी १८ सप्टेंबर २०१९ रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून वाशीम पोलिस आरोपी महिलेचा शोध घेत होते.
पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे आणि अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने प्रलबित गुन्ह्यांतील पसार आरोपींची शोध मोहीम हाती घेतली. दरम्यान, आरोपी आशा थोरात लोणावळा येथे राहत असल्याची गोपनीय व तांत्रिक माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांना मिळाली. त्यांनी लगेच एलसीबीचे पथक लोणावळ्याला रवाना केले. तेथे सापळा रचून आशा थोरात हिला ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई पोलिस उपनिरीक्षक निलेश जाधव, हवालदार विनोद अवगळे, महेश वानखेडे, अंमलदार विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, गोपाल चौधरी, महिला अंमलदार तेजस्विनी खोडके आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने पार पाडली.