age-limits-to-fatherhood गर्भधारणा तसेच अपत्यप्राप्तीकरिता मातेचे वय महत्त्वाचे मानले जाते. मात्र संततीप्राप्तीसाठी केवळ आईच्याच नव्हे तर वडिलांचेही वय महत्त्वाचे ठरते हे आता संशोधनातून समोर येत आहे. गर्भधारणेसाठी केवळ मातेचेच नव्हे तर वडिलांचे वयदेखील परिणामकारक ठरते. संततीप्राप्तीसाठी वडिलांचे वय उलटून गेले असेल तर गर्भधारणेत समस्या उद्भवतात. याचा फटका नवजात शिशूलाही बसतो. गर्भधारणेची शक्यता धूसर होत जाते. गर्भधारणा झाल्यानंतरही प्रसूतीकाळापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भाशयातील मूलाच्या आरोग्याला सतत धोका जाणवतो. मूल जन्मल्यानंतरही आरोग्याच्या तक्रारी सुरु राहतात. वडिलांचे वय जास्त असल्यास जन्मलेल्या मूलाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम दिसून येतो, असे या संशोधनातून स्पष्टपणे नमूद आले आहे.
गर्भधारणेच्या वेळी वडिलांचे वय का महत्त्वाचे असते ?
age-limits-to-fatherhood गर्भधारणेच्यावेळी पुरुषाच्या वयाला ‘वडिलांचे वय’ असे संबोधले जाते. किशोरवयापासूनच पुरुषांमधील प्रजनन क्षमतेची सुरुवात होते. या वयात त्यांच्या शरीरात बदल होत असतात. या बदलांमुळे शुक्राणूंची निर्मिती आणि टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचा स्त्राव सुरु होतो. विसाव्या वर्षी शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि संप्रेरकांचे संतुलन हळूहळू स्थिर होते. साधारणपणे वयाच्या 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान पुरुषांची प्रजनन क्षमता पूर्णपणे विकसित झालेली असते. या वयोगटातील पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या स्थिरावते. त्यांना पुरेशी गती प्राप्त होते. डीएनएची गुणवत्ताही सुधारते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. गर्भधारणेतील भ्रूण निरोगी जन्माला येण्याची शक्यता दुणावते. मात्र, पुरुषांमधील ही सक्षम प्रजनन क्षमता उतारवयात क्षीण होते.
नकळत कमी होत जाणारी पुरुषांची प्रजनन क्षमता
age-limits-to-fatherhood मुळात पुरुषांना महिलांप्रमाणे प्रजनन क्षमतेच्या वयोमर्यादेच्या समस्या उद्भवत नाही. त्यांच्या शरीरात आयुष्यभर शुक्राणूंची निर्मिती होत असते. वाढत्या वयानुसार शुक्राणूंच्या गुणवत्तेत बदल होतो. हे शुक्राणू शरीरात मुबलक प्रमाणात असले तरीही उतारवयात त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. विविध संशोधनानुसार, वयाच्या पस्तीशीनंतर शुक्राणूंमध्ये सूक्ष्म बदल घडायला सुरुवात होते. त्यांची हालचाल मंदावते. शुक्राणूंचा आकार आणि रचनाही बदलते. वीर्याचे प्रमाण कमी होते. शुक्राणूंना स्त्रीच्या अंड्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. याचा थेट परिणाम फलन प्रक्रियेवर होतो. परिणामी, गर्भधारणा होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
वाढत्या वयाचा फटका डीएनएलाही बसतो. शुक्राणूंच्या डीएनएची गुणवत्ता घटते. वाढत्या वयात शरीरात शुक्राणू तयार करणा-या पेशींचे विभाजन होते. ही विभाजनाची प्रक्रिया सतत घडत असल्याने जनुकीय रचनेत चुका होण्याची शक्यता बळावते. कालांतराने डीएनए फ्रॅग्मेंटेशनची समस्या उद्भवते. शुक्राणूंमधील जनुकीय घटकांमध्ये बिघाड होतो. हे बदल शरीराच्या अंतर्रचनेत घडत असल्याने बाहेरुन दिसून येत नाहीत. मात्र, त्यांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. अशा बदलांमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते. गर्भाशयातील भ्रूणाच्या विकासावरही परिणाम होण्याची शक्यता असते.
गर्भ आणि संततीच्या आरोग्यावर होणारा परिणाम
age-limits-to-fatherhood वाढत्या वयासोबत पुरुषांमध्ये सतत जनुकीय बदल होत असल्याचे दिसून येते. यातील बहुतांश बदल निरुपयोगी ठरतात. मात्र काही बदलांचा गर्भाच्या विकासावर तसेच मूल जन्मल्यानंतर त्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो. विविध संशोधनानुसार, वयस्कर पुरुषांमुळे गर्भपाताचा धोका संभवतो. यामध्ये शुक्राणूंमधील जनुकीय दोष आणि इतर घटक कारणीभूत ठरतात. अशा बदलांमुळे गर्भाशयात फलित अंड्याचे रोपण योग्यरित्या होत नाही. सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाची वाढ खुंटण्याची भीती असते. गर्भधारणा टिकून राहण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या निर्णय प्रक्रियेत पुरुषांचे वय हा घटक फार महत्त्वाचा ठरतो.
age-limits-to-fatherhood यशस्वीरित्या गर्भधारणा झाल्यानंतरही बाळाच्या आरोग्यावरचे संकट गडदच होत जाते, असे विविध संशोधनाच्या अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे. वडिलांचे वय जास्त असल्यास जन्मलेल्या मुलामध्ये जनुकीय आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांचा धोका जास्त असतो. यामध्ये ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसोर्डर’ आणि ‘स्किझोफ्रेनिया’ यांसारख्या विकारांचा समावेश आहे. आईच्या वयापेक्षाही वडिलांचे वय हे मुलांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. वडिलांचे वय जास्त असल्यास मुलाचे आरोग्य आणि एकूण विकासावर व्यापक परिणाम दिसून येतो. मात्र या आजाराचे संभाव्य धोके फारच कमी असतात, असेही तज्ज्ञांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
योग्य वयात मूल जन्माला घालणे याकरिता पुरुषांचे वयही महत्त्वाचे असते हे सिद्ध होते. हा केवळ प्रजनन क्षमतेपुरता मर्यादित असून, एकूण प्रजनन आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा विषय ठरतो.