अमरावती
Amravati Ashram School Food अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुरुवारी रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने आश्रमशाळा प्रशासनात खळबळ उडाली.
विशेष म्हणजे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या मेळघाट दौऱ्यावर असतानाच ही घटना समोर आल्याने प्रशासनाची मोठी धावपळ झाली.टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (ता.२५) रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत बाधित विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या आश्रमशाळांना ‘सेंट्रल किचन’मधून जेवणाचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून परिसरातील ८ ते ९ शाळांना अन्न पाठवण्यात आले होते. मात्र, इतर कोणत्याही शाळेत अशा प्रकारची घटना घडली नसून केवळ टीटंबा येथील आश्रमशाळेतच विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे समोर आले आहे.
विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकादशीच्या दिवशी तयार करण्यात आलेले उपासाचे पदार्थ, दूषित पाणी किंवा अन्न खराब झाल्यामुळे हा प्रकार घडला का, याचा तपास प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.प्रकल्प बालविकास अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, सर्व बाधित विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून पालकांनी आणि नागरिकांनी रुग्णालयात अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या घटनेनंतर सेंट्रल किचनमधील अन्नाचा दर्जा आणि अन्न सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी स्थानिक पालकांकडून करण्यात येत आहे.