कॅनडा,
anahat-singh : कॅनडामध्ये पार पडलेल्या जागतिक ज्युनियर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षीय भारतीय खेळाडू अनाहत सिंह हिने सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला आहे. अंतिम सामन्यात इजिप्तच्या रुक्कया सालेम हिचा पराभव करत अनाहतने विजेतेपद पटकावले असून, ही मानाची स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
अंतिम सामन्यात एकतर्फी वर्चस्व
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनाहतने इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित खेळाडू रुक्कया सालेम हिचा सरळ तीन संचांमध्ये ११-३, ११-७ आणि ११-९ असा धुव्वा उडवला. संपूर्ण सामन्यादरम्यान अनाहतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.
२१ वर्षांनंतर ऐतिहासिक यश
यापूर्वी २००५ मध्ये भारताची खेळाडू जोश्ना चिनप्पा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, परंतु तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर २१ वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारताना अनाहतने हे ऐतिहासिक विजेतेपद स्वतःच्या नावे केले.

क्रीडामंत्र्यांकडून कौतुक
अनाहतच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. "अनाहत सिंहने इतिहास रचला आहे! जागतिक ज्युनियर स्क्वॉश अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय ठरल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन. तिची ही अतुलनीय कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद क्षण आहे," असे त्यांनी नमूद केले.
ऑलिम्पिकमधील आशा उंचावल्या
२०२८ च्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. सध्या वरिष्ठ गटाच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या २० खेळाडूंमध्ये स्थान मिळवलेल्या अनाहतच्या या विजयामुळे तिची कामगिरी अधिक उंचावली असून, आगामी ऑलिम्पिकमध्येही ती भारतासाठी पदक मिळवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.