मला वाटेल तिथे स्पर्श केला, जळती सिगारेट लावली..

दिग्गज अभिनेत्रीने सांगितला सर्वांत वाईट अनुभव

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
मुंबई
apara mehta ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेत तुलसी विरानीची सासू सरिता विरानी ही भूमिका साकारून अभिनेत्री अपरा मेहता घराघरात पोहोचल्या. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. एक काळ असा होता की अपरा मेहता यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असायचे. मात्र, या लोकप्रियतेसोबतच त्यांना काही त्रासदायक प्रसंगांनाही सामोरे जावे लागले होते.
 

apara mehta reveals shocking fan craze during kyunki saas bhi kabhi bahu thi fame days 
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अपरा मेहता यांनी त्यांच्या लोकप्रियतेच्या काळातील एक धक्कादायक आठवण सांगितली. मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांचे गुजराती नाटकाचे प्रयोग कोलकातामध्ये सुरू होते. नाटकाचे पाच प्रयोग आयोजित करण्यात आले होते. या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असायची आणि सभागृह पूर्णपणे भरलेले असायचे.
अशाच एका प्रयोगादरम्यान अपरा मेहता यांनी रंगमंचावर प्रवेश करताच प्रेक्षकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. त्यांना पाहताच लोकांनी तब्बल ८ हजार दांडिया हवेत उडवल्या होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली.
मात्र, चाहत्यांचा हा उत्साह पुढे नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यातून अपरा यांना त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागला. त्या म्हणाल्या, “चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. काहींनी मला खेचून म्युजिशियनच्या पोडियममध्ये नेले होते. लोक माझी धक्काबुक्की करत होते, काहीजण मला ओढत होते. तरीही मी चाहत्यांशी चांगल्या पद्धतीने भेटण्याचा प्रयत्न करत होते.”
 
 
अपरा यांनी पुढे सांगितले की, काही चाहत्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्याचाही प्रयत्न केला. “मी काही लोकांशी हस्तांदोलन केले. त्यावेळी एका व्यक्तीने माझ्या हातातील हिऱ्याची अंगठी खेचण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या व्यक्तीने माझ्यावर जळती सिगारेट फेकली. संपूर्ण पोडियम हलू लागले होते. हा अनुभव खूपच धक्कादायक होता,” असे त्या म्हणाल्या.त्या पुढे म्हणाल्या, “गर्दीत लोक अक्षरशः वेडे झाले होते. मला पोडियमवरून खाली उतरण्यास सांगितले जात होते. काही लोकांनी मला खाली उतरवण्यासाठी घेराव केला होता. त्या गर्दीत प्रत्येकजण मला वाटेल तिथे स्पर्श करत होता. मी मनात म्हटले, ठीक आहे, करा स्पर्श… तुम्हाला कायच मिळेल.”अपरा मेहता यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ व्यतिरिक्त ‘खिचडी’, ‘सात फेरे’, ‘राजा की आएगी बारात’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. टेलिव्हिजन विश्वातील त्यांच्या कामामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली असून, त्यांच्या या आठवणीने प्रसिद्धीच्या झगमगाटामागील कठीण अनुभवही समोर आला आहे.