राजकीय 'भूकंप' दिल्लीप्रवासाच्या चर्चांना पूर्णविराम

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
मुंबई
devendra fadnavis केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेल्याने त्यांच्या केंद्रातील मंत्रिपदाबाबत तर्क-वितर्कांना आणखी हवा मिळाली होती. मात्र, या सर्व चर्चांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. “मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी दिल्लीतील संभाव्य जाण्याच्या चर्चांना विराम दिला.
 

devendra fadnavis clears delhi move rumours, says will continue as maharashtra cm 
गेल्या महिनाभरापासून देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्यापासून या चर्चांना अधिक वेग आला होता. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून याच कालावधीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत विविध अंदाज बांधले जात होते.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा सातत्याने सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काल पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत पूजा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांना दिल्लीत जाण्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला.
त्यावेळी फडणवीस यांनी, “जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं,” असे सांगितले. आपल्याला जे मिळाले आहे त्यात आपण समाधानी असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी केंद्रातील मंत्रिपदाच्या चर्चांना अप्रत्यक्षपणे पूर्णविराम दिला.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील devendra fadnavis भाजपचे प्रमुख आणि प्रभावशाली नेते मानले जातात. राज्याच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड असून महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आकार मिळाला आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील कामांमुळे त्यांना ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ अशी ओळखही मिळाली आहे.दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आहे. या घडामोडींनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असला तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सोडून दिल्लीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.