‘हिंसेचा कट नाकाम केला...’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मोठा दावा!

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
भोपाळ,
dharmendra-pradhan-resignation : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत मध्य प्रदेशचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी मोठा दावा केला आहे. भारतामध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेसारखी हिंसाचार आणि अराजकता पसरवण्याचा परदेशी शक्तींचा कट धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे पूर्णपणे निष्फळ ठरला असल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.
 
 
kailash-vijayvargiya
 
 
पहिल्याच दिवशी दिली होती राजीनाम्याची ऑफर
कैलास विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी पक्षसंघटनेप्रती आपली जबाबदारी स्वीकारत पक्षध्यक्षांसमोर राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. जर पक्षनेतृत्वाला योग्य वाटत असेल तर आपण त्वरित पद सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यावेळी पक्षनेतृत्वाने त्यांना थांबवले होते. नंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून योग्य वेळ येताच पक्षाने निर्णय घेतला आणि प्रधान यांनी तातडीने पदाचा राजीनामा दिला.
परदेशी ताकद आणि कट उधळला
विजयवर्गीय म्हणाले की, ज्या परदेशी शक्तींना भारतात हिंसा भडकवून अशांतता आणि अराजकता निर्माण करायची होती, त्यांचे मनसुबे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे धुळीस मिळाले आहेत. देशातील स्थिरतेला धक्का पोहोचवण्याचा परदेशी कट या निर्णयामुळे निष्फळ ठरला असून, या महत्त्वपूर्ण पावलाबद्दल त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले.
विरोधी पक्षावर जोरदार टीका
यावेळी विजयवर्गीय यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष आता फक्त दुसऱ्यांच्या आंदोलनांचे श्रेय लाटण्याचे काम करत आहे. निवडणुकांमधील पराभवानंतर निराश झालेल्या काँग्रेसला या आंदोलनाच्या रूपात एक नवी संधी दिसली आणि ते आंदोलकांच्या मागे जाऊन उभे राहिले. स्वतः प्रत्यक्ष काही न करता केवळ इतरांच्या आंदोलनाचा फायदा उठवणे हेच काँग्रेसचे धोरण राहिल्याचा आरोपही त्यांनी केला.