ईडीची मोठी कारवाई ५१२ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
मुंबई
ED ५०० कोटी रुपयांहून अधिकच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने वांद्रे येथील रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी येथील एका भूखंडावर तात्पुरती जप्तीची कारवाई केली आहे. या दोन्ही मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ३३२ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई प्रभुदास वीरचंद लोटिया आणि इतर आरोपींशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे.
 

ED Attaches Mumbai’s Rangsharda Hotel Assets in ₹500 Crore Money Laundering Case 
ईडीच्या माहितीनुसार, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मराठी रंगभूमी, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रंगशारदा प्रतिष्ठान ट्रस्टला सवलतीच्या दरात हा भूखंड दिला होता. मात्र, संबंधित व्यक्तींनी या जमिनीचा व्यावसायिक वापर करून भूखंड वाटपाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे सुरू करण्यात आला आहे. रंगशारदा प्रतिष्ठान ट्रस्टच्या विश्वस्तांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये प्रभुदास लोटिया आणि रंगशारदा हॉटेल्सवर फसवणूक तसेच विश्वासघाताचा आरोप करण्यात आला आहे.
तपासादरम्यान ईडीला असे आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे की, प्रभुदास लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून ट्रस्टला देण्यात आलेल्या जमिनीवर कथितरित्या बेकायदेशीर ताबा आणि नियंत्रण मिळवले. तसेच भूखंड वाटपाच्या अटी आणि आवश्यक नियामक परवानग्यांचे उल्लंघन करून या जागेचा व्यावसायिक वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडने ट्रस्टला देण्यात येणारे नाट्यगृह आणि कलाकारांच्या निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्याऐवजी आवश्यक वैधानिक परवानग्या न घेता त्याच परिसरात हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, मद्य बार, बँक्वेट हॉल आणि इतर व्यावसायिक आस्थापना चालवण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे ईडीने सांगितले आहे.
 
 
ईडीच्या ED  दाव्यानुसार, प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी ट्रस्टच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक जागांची कथित अनधिकृत विक्री केली. या विक्रीतून मिळालेल्या पैशांचा वापर प्रभादेवी येथील अन्य मालमत्ता खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.ईडीने सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणातील गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाची रक्कम सुमारे ५१२ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यामध्ये हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, बार, बँक्वेट सुविधांमधून मिळालेले उत्पन्न तसेच भाडे आणि इतर स्रोतांमधून मिळालेल्या रकमांचा समावेश आहे.
याआधीही ईडीने अनिल अंबानी समूहाशी संबंधित प्रकरणात मोठी कारवाई केली होती. त्या वेळी ३ हजार ८४ कोटी रुपयांच्या ४० हून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.