शेतकऱ्यांनी आधुनिकसह सामूहिक शेतीची कास धरावी : भोयर

बोरी कोकाटे येथे बळीराजा सन्मान सोहळा व कार्यशाळा

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
pankaj-bhoyar : शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सामूहिक गट शेती तसेच कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. यासाठी पोकरा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 
 
HJKH
 
 
 
सेलू तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथे नाविण्यपूर्ण प्रयोग करुन शेती करणार्या शेतकर्यांचा सन्मान करण्यासाठी बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच पाटबंधारे विभागाच्यावतीने बोर व धाम प्रकल्पावरील कालव्याच्या वितरण प्रणालीच्या दुरुस्ती व नुतनीकरण कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. मनिषा कायंदे, अॅड. सुधीर कोठारी, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, तहसिलदार शकुंतला पाराजे, राजेश सराफ, अशोक कलोडे, अशोक मुडे, सहाय्यक अभियंता सतीश मोवाडे, घोराडच्या माजी सरपंच ज्योती घंगारे आदी उपस्थित होते.
 
शेतकरी आत्मनिर्भर व समृद्ध व्हावा यासाठी शासनाच्यावतीने किसान सन्मान योजना, बळीराजा पांदण रस्ते योजना, बळीराजा मोफत वीज आदी योजनांसोबतच विविध अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना समृद्ध कसे करता येईल यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. सेलू तालुक्यातील शेतकर्यांनी नाविण्यपूर्ण शेती केल्यामुळे त्यांचा सन्मान राज्यस्तरावर झाला. त्यांचे अनुकरण इतर शेतकर्यांनी करुन फळ, भाजीपाला लागवड करावी, असेही पालकमंत्री म्हणाले.
याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते फळ, फुल, भाजीपाला, रेशीम शेती करणार्या तसेच तेल युनिट उभे करणार्या युवा शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक अरविंद उपरीकर यांनी केले. तत्पूर्वी बोर प्रकल्पाजवळील कालवा वितरण प्रणालीचे पालकमंत्री भोयर यांनी भूमीपूजन व बोर प्रकल्प परिसरात पर्यंटकासाठी लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे लोकार्पण तसेच केळी उत्पादक शेतकर्यांच्या अभ्यास दौरा वाहनाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
राज्यात प्रथमच दुरुस्तीच्या कामासाठी २८४ कोटी मंजूर
 
बोर प्रकल्पातील कालवा प्रणाली दुरुस्तीसाठी १४८ कोटी व धाम प्रकल्पातील कालवा वितरण प्रणाली दुरुस्तीसाठी १३६ कोटी असे २८४ कोटी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कालवा दुरुस्तीच्या कामासाठी मंजूर केलेले आहे. या कामामुळे बोर प्रकल्पातील ७७ गावे व धाम प्रकल्पामुळे ४८ गावांना लाभ मिळणार आहे.