गहाण शेतीचे पैसे दिले; पण सावकाराची नियत पलटली

*शेतकरी पुत्राची आत्महत्या *खंडाळा येथील घटना

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
समुद्रपूर,
suicide-incident : आईच्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी सावकाराकडून २ लाख रुपये कर्ज काढले. याबदल्यात शेतकरी पुत्राला सावकाराच्या नावावर शेती करावी लागली. मागील दहा वर्षांत सावकाराचे व्याजासह कर्ज फेडले. मात्र, कर्ज फेडूनही सावकार शेती परत करीत नसल्याने अखेर त्या शेतकरीपुत्राने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हा धकादायक प्रकार खंडाळा येथे २५ रोजी दुपारी १२ वाजता उघडकीस आला. रवींद्र दादाजी झाडे असे मृत शेतकरीपुत्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र झाडे हा २४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता कोणालाही न सांगता घरून निघून गेला.
 

JLK 
 
 
दुसर्‍या दिवशी त्याच्याच शेतातील विहिरीत त्याचा दुपट्टा पाण्यावर तरंगताना दिसल्याने गावकर्‍यांनी कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. यावेळी मोटर पंपाच्या साहाय्याने विहिरीचे पाणी तोडले असता त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. रवींद्रची आई बेबी यांचा नावे शेती होती आईला दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने तिच्या उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने १० वर्षांपूर्वी एका सावकाराकडून २ लाख रुपये व्याजाने घेतले होते. सावकाराने शेती आपल्या नावाने करून घेतली. या दरम्यान, सावकाराचे सर्व पैसे परत केले. आता रवींद्रने शेती परत मागितली असता सावकार त्याला टाळाटाळ करू लागला. तारीख वर तारीख देऊन रवींद्रचे मानसिक खच्चीकरण सुरू होते. याच दरम्यान, सावकाराने रवींद्रची शेती दुसर्‍याच्या नावाने करून दिली. हा प्रकार रवींद्रला कळता तो सावकाराच्या भेटीला गेला. याबाबत जाब विचारताच सावकाराने ३० लाख रुपये घेऊन ये आणि तुझं शेत वापर घेऊन जा, अशी अट घातली.
 
 
त्यामुळे रवींद्रचे मानसिक संतुलन बिघडले. याबाबतची माहिती त्याने अनेक गावकर्‍यांना सुद्धा दिली. सावकाराचे संपूर्ण पैसे परत केल्यानंतरही तो माझे शेत देत नाही, उलट त्याने माझे शेत दुसर्‍याला विकल्याची माहितीही गावकर्‍यांना दिली. दरम्यान, हा जाच सहन न झाल्याने अखेर रविंद्रने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी समुद्रपूर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात दीपक वानखेडे करीत आहे.