वाघाच्या धास्तीने विद्युत कर्मचारी अडकले खांबावर

*फुलझरी जंगल परिसरातील थरारक घटना

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
चंद्रपूर, 
fear-of-a-tiger : जंगल भागात विद्युत खांबावर चढून दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत कर्मचार्‍यांना अचानक वाघाची चाहूल लागली. घाबरलेल्या कर्मचार्‍यांनी विद्युत खांबावर बसूनच वाघ जाईपर्यंत एक तास घालवला. मृत्यूला अक्षरश: चकवा दिल्याची थरारक घटना मूल तालुक्यातील फुलझरी येथे 23 जुलै रोजी घडली असून, याची चित्रफीत आता समाज माध्यमावर चांगलीच ‘व्हायरल’ होत आहे.
 
 
JLK
 
 
फुलझरी आणि डोणी हा परिसर घनदाट जंगलातील असून, येथे वाघांचा मोठा संचार आहे. वाघाच्या हल्ल्याच्या घटना येथे वारंवार घडत असतात. मूल तालुक्यातील फुलझरी जंगल परिसरात वीज वितरणचे दोन कर्मचारी खांबावर चढून विद्युत दुरुस्तीचे काम करीत होते. यावेळी त्यांना जंगलातून एक वाघ भ्रमंती करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे वाघाच्या धास्तीने त्यांनी खांबावर चढूनच आपला वेळ घालविला. जवळपास हे दोन वीज कर्मचारी एक तास विद्युत खांबावर अडकले होते. वाघाने तिथून पुढे प्रयाण केल्यानंतर कर्मचार्‍यांनी आपली वाहने घेऊन निसटता पाय काढला.