भिषण आगीत चार दुकाने जळून खाक

७० लाख रुपयाचे नुकसान

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
शिरपूर जैन, 
shops-gutted-in-fire : २५ जुलै रोजी मध्यरात्री दरम्यान स्थानिक ढवळे विद्यालयाच्या समोर चार दुकानांना अचानक भिषण आग लागली. या आगीमध्ये चारही दुकानातील अंदाजे ७० लाखाचे साहित्य जळून खाक झाले. सकाळच्या सुमारास अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते.
 
 

jlk 
 
 
 
येथील जगदीश गाभणे, वामन गाभणे व शंकर गाभणे यांचे टिन पत्राने बनविलेले शेड आहे. त्यामध्ये येथील पत्रकार कैलास भालेराव यांचा मुलगा आकाश कैलास भालेराव यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे . या दुकानाला सुरू करून या महिन्यातच एक वर्षे पूर्ण झाले. नुकतेच त्यांनी दुचाकी वाहनाचे नविन साहित्य दुकानामध्ये भरले होते. दरम्यान २५ जुलै रोजी रात्री या दुकानाला भिषण आग लागली. त्यामध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. ग्राहकांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या तीन दुचाकी गाड्या, वाहनाचे स्पेअर पार्ट व मशनरी इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये त्यांचे तब्बल १४ लाख रुपयाचे नुकसान झाले. तसेच या दुकानाला लागूनच असलेले मदन दिनकर इंगोले रा. शेलगाव यांचे हार्डवेअरचे दुकानातील संपूर्ण शेती साहित्य व इतर माल जळून खाक झाला. त्यामध्ये त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच त्याला लागून असलेले जगदीश गाभणे यांचे एक फिल्टर सुद्धा जळून खाक झाले. तसेच ओमकार भांदुर्गे यांचे पान शॉप व डेलिनिडचे दुकानही जळून खाक झाले आहे. त्यामधील साहित्य संपूर्ण जळाले आहे. सदर आग ही मध्यरात्री नंतर लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती कैलास भालेराव यांना सकाळी चार वाजता दरम्यान मिळाली.
 
 
 
माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरपूर पोलिसही घटनास्थली दाखल झाले. मात्र, त्यावेळी लागून असलेले हार्डवेअरच्या दुकानाने संपूर्णपणे पेट घेतला होता. काही वेळाने मात्र चारही दुकाने आगीच्या विळख्यात येऊन भस्मसात झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु अग्निशमन दल एक तासाने उशिरा आल्याने आगेवर नियंत्रण मिळवण्याच्या आधीच चारही दुकाने जळून खाक झाली होती. सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाशीम व रिसोड येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. रिसोड व वाशीम येथील अग्निशमनच्या गाड्या आल्याने मोठी हानी टळली. घटनेची माहिती मिळताच पोनि योगिता भारद्वाज व कर्मचार्‍यांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. तसेच नागरिकांनीही पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिरपूरचे ग्रामविकास अधिकारी काकडे व तलाठी भुरकाडे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. त्यामध्ये अंदाजे ७० लाख रुपयाचे या चारही व्यवसायिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर घटनेने या व्यवसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने सदर व्यवसायिकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
 
 
मालेगाव नगरपंचायतचे अग्नीक्षमन दल एक तास उशीरा पोहोचले. त्यामधील दहा मिनिटांमध्ये पाणी संपले. त्यातील कॉम्प्रेसरही व्यवस्थीत काम करीत नव्हता. पाणी भरुन आणावे तर गाडी सुरू होत नव्हती. मात्र, येथील बबलू देशमुख यांनी ती गाडी नेली आणि पाणी भरून परत आणली. शेवटी वाशीम येथील शंकर वानखेडे यांच्या प्रयत्नाने वाशीमचे अग्नीशमन दल येथे पोहोचले. तसेच रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांना फोन लावताच त्यांनीही तातडीने अग्निशमन दलास येथे पाठविले. हे दोन्ही अग्नीशमन दल उशिरा का होईना परंतु, आल्यामुळे इतर मोठी दुर्घटना टळली.