तभा वृत्तसेवा
उमरखेड,
fraud : बाजारभावापेक्षा कमी दरात सिमेंट, स्टील व साखर पुरविण्याचे आमिष दाखवून व्यापारी व शासकीय कंत्राटदारांची तब्बल 3 कोटी 68 लाख 88 हजार 101 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोफाळी पोलिसांनी आर. के. एंटरप्रायजेसचा मालक रामेश्वर केशव कुèहाडे (रा. तरोडा, ता. उमरखेड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) व 316 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने पोफाळी येथे या वस्तुंचा ठोक व्यवसाय सुरू करून स्वतः ओएनजीसी कंपनीत कर्मचारी असल्याचे सांगत बाजारभावापेक्षा कमी दरात माल देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला नियमित मालपुरवठा करून व्यापारी व कंत्राटदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 2 मे 2025 ते 23 मार्च 2026 या कालावधीत आरटीजीएस व ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कम स्वीकारून मालाचा पुरवठा न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात उमरखेड, फुलसावंगी, वाई बाजार, सारकणी व पुसद येथील व्यापारी व शासकीय कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. तक्रारदारांनी सादर केलेल्या बँक व्यवहारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार नीलेश शेमबाडे करीत आहेत.
दरम्यान, पोफाळी पोलिसांनी नागरिक, व्यापारी व कंत्राटदारांना बाजारभावापेक्षा अत्यल्प दरात माल देण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे तसेच आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यापारी किंवा संस्थेची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.