चंदीगड
FSSAI चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसमधील प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवल्याप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मोठी कारवाई केली आहे. ट्रेनच्या पेंट्री कारचे संचालन करणाऱ्या ‘सोपान रेस्टॉरंट’विरोधात कारवाई करत प्राधिकरणाने दंड ठोठावला आहे. शनिवारी FSSAIने यासंदर्भात माहिती दिली.
FSSAIने जारी केलेल्या निवेदनानुसार, चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमध्ये खराब दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री केल्याप्रकरणी सोपान रेस्टॉरंटविरोधात दंडात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, संबंधित ऑपरेटरवर किती रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे, याची माहिती प्राधिकरणाने दिलेली नाही.
ही कारवाई ट्रेन क्रमांक 15904 च्या पेंट्री कारमधून खरेदी करण्यात आलेल्या ‘नोवा फ्लेवर्ड डबल टोंड मिल्क’च्या नमुन्याच्या तपासणीनंतर करण्यात आली. या नमुन्याची तपासणी आसाममधील स्टेट पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीमध्ये करण्यात आली होती. अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार, हा नमुना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 अंतर्गत निकृष्ट दर्जाचा आढळून आला.
FSSAIने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री केल्याप्रकरणी पेंट्री कार ऑपरेटर सोपान रेस्टॉरंटविरोधात दंड ठोठावण्याचा आदेश देण्यात आला आहे. अलीपुरद्वार येथील अधिकाऱ्यांनी हा आदेश जारी करत सोपान रेस्टॉरंटच्या अधिकृत प्रतिनिधीवर निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली.
दरम्यान, याच आठवड्याच्या सुरुवातीला FSSAIने पंजाबमधील रिहान हेल्थकेअरचा परवाना निलंबित केला होता. कंपनीच्या हेल्थ सप्लिमेंट्स आणि न्यूट्रिएंट्सच्या उत्पादन केंद्रात तपासणीदरम्यान नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले होते. यापूर्वी अन्न नियामकाने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी इंस्टामार्टविरोधातही कारवाई केली होती.
महाराष्ट्रातही अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अलीकडेच मुंबईतील पाच बेकरींचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये प्रसिद्ध बिम्बो ब्रिस्टल बेकरीचाही समावेश आहे. ही बेकरी फोर्ट परिसरातील जवळपास 100 वर्षे जुन्या पारसी रेस्टॉरंट जिमी बॉयची सहयोगी संस्था आहे.
FDAने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये बेकरीतील ब्रेड तयार करण्याच्या ओव्हनमध्ये आणि फ्रीजरच्या आत झुरळे फिरताना दिसून आली होती. FDAच्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात झुरळे, माशा आणि इतर कीटकांचा सक्रिय प्रादुर्भाव आढळून आला.