गोंदिया,
farmers-debt-free : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महायुती सरकारने राज्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा देत दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जाची माफी जाहीर केली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकर्यांना लाभ मिळणार असून, शनिवारी 25 जुलै शासनाने कर्जमाफीस पात्र शेतकर्यांच्या जिल्हानिहाय याद्या प्रसिद्ध केल्या आहे. ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 29 हजार 994 शेतकरी पात्र ठरले असून हे शेतकरी आता कर्जमुक्त होणार आहेत.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून, महायुती सरकारने दिलेला शब्द पाळल्याची भावना शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांनुसार गोंदिया जिल्ह्यात 558 याद्या जाहीर करण्यात आल्या असून जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, सहकारी तसेच खासगी बँकांमधील एकूण 29 हजार 994 शेतकरी या योजनेस पात्र ठरले आहेत. त्यापैकी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 20 हजार 915 हून अधिक शेतकर्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणार्या पात्र शेतकर्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांना 127 कोटी 33 लाख रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून, इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी मानली जात आहे. दरम्यान, पात्र शेतकर्यांना आधार प्रमाणीकरण व आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, त्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित बँकांच्या माध्यमातून समायोजित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्यांना नवीन पीक कर्जाची उचल करणे सोपे होणार आहे. महायुती सरकारने शेतकर्यांच्या हितार्थ घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून या निर्णयाने शेतकर्यांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे.
खा. पटेल व खा. जैन यांनी मानले आभार...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महायुती सरकारने राज्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा असल्याचे सांगत खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांनी राज्य शासनाचे आभार मानले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून घेतलेला महत्वपुर्ण निर्णय असल्याचे सांगत कर्जमुक्तीच्या निर्णयामुळे शेतकर्यांना नवीन बळ मिळाले असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.