ग्रामपंचायत प्रशासनाने चिखलमय रस्त्यावर टाकली खडी

विनोद राठोड यांच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
मानोरा, 
muddy-road : तालुक्यातील तीर्थक्षेत्र अमरगड (वाईगोळ) येथील मागील दोन वर्षांपासून चिखल व खड्डेमय झालेल्या अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिक विनोद विठ्ठल राठोड यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर खडी टाकून नागरिकांना दिलासा दिला आहे.
 
 
 
muddy-road
 
 
 
संपूर्ण रस्ता चिखल, खडी आणि पाण्याने भरलेला आहे. दोन्ही बाजूला घरे असून दुचाकीस्वार जीव मुठीत धरून मार्ग काढत आहेत. पावसाळ्यात हीच परिस्थिती आणखी गंभीर होते. अनेक वर्षांपासून हे रस्ते खड्डेमय असूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती, अशी तक्रार स्थानिक निवासी विनोद विठ्ठल राठोड यांनी काही वृत्तपत्रांकडे केली होती. वृत्तपत्रांनी याची दखल घेत बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. राठोड यांच्या मागणीपुढे झुकत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने चिखलात बुडालेल्या रस्त्यावर गिट्टी-खडी टाकली. यामुळे तात्पुरती का होईना, पण स्थानिक नागरिक व शाळकरी मुलांची गैरसोय काही प्रमाणात कमी झाली आहे.
 
 
 
तात्पुरत्या उपायासोबतच या रस्त्याचे लवकरात लवकर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तीर्थक्षेत्र असल्याने दररोज भाविकांची वर्दळ असते. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणेही कठीण होते, त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढावा. विनोद राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला काम करावे लागल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.