तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
grand-pandharichi-wari : माजी मंत्री मदन येरावार, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्या मार्गदर्शनात, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापुरे यांच्या नेतृत्वात प्रथमच आयोजित भव्य पंढरीच्या वारीने यवतमाळच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहिला.
यामध्ये लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत हजारो भाविकांनी या वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरातील प्रमुख मार्गांवर विठ्ठल.. विठ्ठल.., ज्ञानबा.. तुकाराम.. आणि हरिनामाच्या अखंड गजराने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
टाळ-मृदंग, अभंग, वारकरी वेशभूषा आणि महिलांचा शिस्तबद्ध सहभाग यामुळे यवतमाळला जणू पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले. मार्गभर नागरिकांनी वारीचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली, तर अनेकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीचे दर्शन घेऊन भक्तिभाव व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापुरे म्हणाल्या, प्रत्येक गृहिणीला प्रत्यक्ष पंढरपूरची वारी करणे शक्य होत नाही. म्हणून यवतमाळमध्येच पंढरीचा अनुभव आणि विठ्ठलभक्तीचा आनंद प्रत्येक महिलेला मिळावा, या भावनेतून या वारीचे आयोजन करण्यात आले. सामाजिक एकात्मता, महिलांचे संघटन, शिस्त, संस्कार आणि भक्ती यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
वारीमुळे विविध समाजघटकांतील महिलांचे मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण झाले. भक्ती, नामस्मरण आणि वारकरी परंपरेच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. भाजपा महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्या आणि स्वयंसेवकांच्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.