तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ichori-deplorable-condition-of-the-road : यवतमाळ तालुक्यातील इचोरी येथे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेताना ग्रामस्थांना आजही अत्यंत बिकट आणि वेदनादायी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नाल्यातून, काट्याकुट्यातून, दगड-गोट्यांतून आणि पाण्यातून वाट काढत मृतदेह न्यावा लागत आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही सन्मानाने अंतिम निरोप देता येत नसल्याची संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही सुस्थितीत वाट नसल्याने प्रत्येक वेळी अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. विशेषतः वृद्धांना या मार्गावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकजण जखमीही झाल्याचे सांगितले जात आहे. या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि संबंधित प्रशासनाकडे अनेकवेळा निवेदने देऊन यदुवंशी नंदगवळी समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी करण्यात आली. मात्र, आजतागायत त्यावर निर्णय झाला नाही.
स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने समाजबांधवांना अनेकदा नाल्याच्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. ही केवळ मूलभूत सुविधांचा अभाव नसून मानवी संवेदनांची उपेक्षा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्मशानभूमीकडे जाणाèया मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था दिसून आली. त्यामुळे शासनाने तातडीने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सर्व हंगामात वापरता येईल असा रस्ता तयार करावा, तसेच यदुवंशी नंदगवळी समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.