कोवळ्या सोयाबीनवर अळ्यांचे आक्रमण

शेतकर्यांचे संकट सुटेच ना!

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
soybean-crops : यावर्षी खरीप हंगामात निसर्गाने शेतकर्यांची जणू चेष्टाच मांडल्याची अनुभूती येत आहे. सोयाबीनचे पीक कोवळ्या अवस्थेत असतानाच सोयाबीनवर आता पाने कुरतडणार्या अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभीच सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहेत.
 
 
 
j
 
 
 
गतवर्षी यलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक हातचे गेले होते त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. परिणामी, अनेक शेतकर्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकात गुरे सोडली होती. काहींनी सोयाबीनची कापणी सुद्धा केली नव्हती. यावर्षी सोयाबीनचे पीक बर्यापैकी येईल या आशेने शेतकर्यांनी शेताची मशागत करून सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. परंतु, बर्याच नामांकित कंपन्यांचे बियाणे उगवलेच नाही. शेतकर्यांनी आर्थिक जुळवा जुळव करीत सोयाबीनचे बियाणे पुन्हा विकत घेतले. रासायनिक खते आणली. पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनची पेरणी रखडली होती. आद्र्रा नक्षत्रात झालेल्या पावसाने शेतकर्यांना तारले. पुनर्वसू नक्षत्रातही बर्यापैकी पाऊस झाला. सोयाबीन बहरू लागले, त्यामुळे आता सोयाबीनचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा असतानाच सोयाबीनवर पाने कुरतडणार्या अळ्यांनी आक्रमण केले.
 
या अळ्या सोयाबीनच्या पानांची कात्रण करीत असून हिरव्या रंगाची आणि उंट अळी पिकांवर दिसून येत आहे. या अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादक संकटात सापडला आहे. सोयाबीन पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्यामुळे सोयाबीन उत्पादक चांगलाच अडचणीत दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी शेतात येऊन सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकर्यांना याबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.