गोंदिया,
leopard-cubs-found : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सोनेगाव परिसरातील शेतशिवारात रविवारी 26 जुलै रोजी दुपारच्या सुमारास बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोनेगाव, शेजगाव, रामपुरी आणि नहरटोला या गावांच्या सीमाभागात घडल्याने चारही गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, शेतात कामासाठी गेलेल्या काही शेतकर्यांना दोन गोंडस बिबट्याची पिल्ले दिसून आली. ही माहिती वार्यासारखी पसरताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचार्यांनी परिसराची पाहणी करून दोन्ही पिल्लांना सुरक्षितरित्या ताब्यात घेत सुरक्षित स्थळी हलवून मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पिल्ले अतिशय लहान असल्याने त्यांची आई अर्थात मादी बिबट जवळपासच्या परिसरातच असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी मादी बिबट आक्रमक होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतात जाताना समूहाने जावे तसेच वन्यप्राण्यांची कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत परिसरात बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.