चंद्रपूर,
attack-on-mim-corporator : येथील ‘एमआयएम’चे नगरसेवक अझहर शेख यांच्यावर 15 ते 16 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक शनिवारी रात्रीच्या सुमारास जटपुरा गेट परिसरात घडली. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. अझहर शेख हे चंद्रपूर महानगरपालिकेतील एमआयएमचे एकमेव नगरसेवक असून, ते जनविकास आघाडीच्या गटात आहेत.
अझहर शेख यांचे शहरातील जटपुरा गेट परिसरात बिर्याणीचे रेस्टारंट आहे. ते शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या रेस्टारंट समोर उभे होते. त्याचवेळी तिथे आलेल्या 15 ते 16 जणांनी त्यांना जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत त्यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. मारहाणीनंतर शेख यांनी कसाबसा आपला जीव वाचवून घटनास्थळावरून पळ काढला. त्यांना जखमी अवस्थेत चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, शहर पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी फराहन, फैजान, फिरोज यांच्यासह अन्य 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. अजहर शेख नगरसेवक असलेल्या रहमतनगर भागात एमआयएम आणि काँग्रेस पक्षातील वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.