-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
नागपूर,
cm devendra fadnavis आजार कितीही गंभीर व मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरीबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. अजित गोपचडे, आ. प्रवीण दटके, आ. संजय भेंडे, आ. मोहन मते, आ. राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, गिरीश व्यास, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, शिबिराचे सहसंयोजक नगरसेवक रितेश गावंडे व अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या घटकाला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या हाच या शिबिराचा उद्देश असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वांना आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले. रुग्णालयांची संख्या वाढवली. राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापूर्वी नसलेले गंभीर आजार समाविष्ट केले. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे ५७ हजार रुग्णांना ४५२ कोटी रुपये उपचारांसाठी उपलब्ध करून दिले. सर्व धर्मादाय रुग्णालयातील बेडस गरीब रुग्णांसाठी राखीव असावेत, यासाठी डिजिटल पद्धती निर्माण केली. जवळपास १० आजार योजना ५ लाख रुपये मर्यादेत बसू शकत नाही, त्यामुळे त्यासाठी ९ लाखांपर्यंत, तर काही आजारांच्या बाबतीत ३५ लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे.
कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया निःशुल्क केल्यामुळे मुले ऐकू व बोलूही शकतील. पुढच्या पिढीत कोणीही मूक- बधिर असणार नाही, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. दिव्यांगांना ९ ऑगस्टला कृत्रिम पाय- हात वितरण केले जाणार आहे. सेवा हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे गरीबातल्या गरीब माणसाला मदत करून समाज निरोगी होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा होत असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. कँसरवरील काही कॅप्सुल, इंजेक्शन यांचा खर्च प्रचंड आहे. तो कमी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
महाआरोग्य शिबिरासारखे उपक्रम देशभर आायोजित होणे गरजेचे असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश म्हणाले. माजी आमदार संदीप जोशी यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, शहरात विविध ठिकाणी १५ ते २२ जुलै या काळात आयोजित शिबिरांमध्ये ३१ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील साडेचार हजार रुग्णांवर निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
फिरता दवाखाना, रुग्णवाहिकेचे लोकार्पण, दिव्यांगांना व्हील चेअरचे वितरण करण्यात आले. अनेक संस्थांतर्फे यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरला देणगी, रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. हे सर्व दाते तसेच महाशिबिराच्या आयोजनात सहभागी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह डॉक्टरांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. महाआरोग्य शिबिरात हृदयरोग, त्वचा, कर्करोग, नेत्र, ईएनटी यासह अनेक आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. नागपूर शहर, जिल्ह्यातून आलेल्या हजारो रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या रुग्णांना औषधे निःशुल्क देण्यात आली. त्यांच्या विविध चाचण्या व शस्त्रक्रियांसह अन्य उपचारांची व्यवस्थाही आयोजकांतर्फे नि:शुल्क करण्यात आली.