मुंबई
mamachya goyala jauya traile गोव्याच्या ट्रिपला निघालेले संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांचा लाडका मामा यांची धमाल आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यामध्ये विनोदासोबतच सस्पेन्स, अॅक्शन आणि अनपेक्षित ट्विस्ट्सची जबरदस्त झलक पाहायला मिळत आहे.
टीझरमधून प्रेक्षकांना या चौघांच्या भन्नाट प्रवासाची झलक मिळाली होती. मात्र, ट्रेलरने या प्रवासात एक वेगळाच थरार निर्माण केला आहे. ट्रेलरच्या शेवटी दिसणारा मामाचा धक्कादायक डॉन अवतार प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. मामा खरोखरच डॉन आहे की, त्यामागे एखादे मोठे रहस्य दडले आहे, याचे उत्तर चित्रपटगृहातच मिळणार आहे.सुरुवात गोव्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या मजेशीर ट्रिपने होते. संत्या, बाबा, कुश्या आणि मामा यांच्यातील धमाल केमिस्ट्री, गमती-जमती आणि सतत होणारे गोंधळ प्रेक्षकांना हसवतात. मात्र, अचानक कथा एका वेगळ्याच वळणावर जाते. अभिनेता अंकुश चौधरीने साकारलेला साधा, भोळाभाबडा आणि निरागस मामा एका क्षणात डॉनच्या रूपात समोर येतो आणि संपूर्ण ट्रेलरचा रंग बदलतो.
यानंतर सुरू होतो पाठलाग, अॅक्शन, कॉमेडी आणि रहस्याचा खेळ. मामा नेमका कोण आहे? तो खरंच डॉन आहे की या सगळ्यामागे काही वेगळे कारण आहे? या प्रश्नांमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांची भन्नाट केमिस्ट्री हा ट्रेलरचा विशेष आकर्षण ठरला आहे. त्यांच्या संवादफेकीचे टायमिंग, विनोदी प्रसंग आणि एकत्रित अभिनय प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. याशिवाय महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्या भूमिका चित्रपटाची उत्सुकता वाढवतात.
नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांचा ग्लॅमरस अंदाजही ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतो.चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले की, ‘स्ट्रगलर साला’मधील संत्या, बाबा आणि कुश्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले होते. यावेळी त्यांच्या आयुष्यात मामा येतो आणि या चौघांचा प्रवास पूर्णपणे बदलतो. हा प्रवास जितका मजेशीर आहे तितकाच अनपेक्षितही आहे. प्रत्येक पात्राची वेगळी खासियत असून, प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना हसवतानाच पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवतो.‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांनी लिहिले आहेत.मैत्री, विनोद, रहस्य आणि अॅक्शनचा फुल ऑन मनोरंजनाचा डोस घेऊन ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट 31 जुलैपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.