नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

काही तासांत तीन वेळा जमीन हादरली, नागरिकांमध्ये भीती

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
नाशिक
nashik earthquake नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील विविध भागांमध्ये काही तासांच्या अंतराने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

nashik earthquake tremors: mild shocks felt three times in surgana and kalwan areas 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात काल सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यानंतर रात्री पुन्हा एकदा परिसरातील नागरिकांना भूकंपाचा अनुभव आला.
रात्री सुमारे 11.55 वाजण्याच्या सुमारास सुरगाणा शहर आणि बोरगाव परिसरात सौम्य धक्के जाणवले. त्यानंतर रात्री 11.56 वाजता कळवण तालुक्यातील दळवट आणि आसपासच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के सुमारे 20 ते 30 सेकंद जाणवत होते. यावेळी घरातील खिडक्या, भिंती आणि छतावरील पत्रे हादरल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले.रात्रीच्या या धक्क्यांनंतर नागरिक सावरत नाहीत तोच पहाटे पुन्हा जमीन हादरली. पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील सराड, चिखली आणि बोरगाव परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. काही तासांच्या अंतराने लागोपाठ बसलेल्या या धक्क्यांमुळे अनेक नागरिकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स्थानिक तहसीलदारांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील नागरिकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण कायम आहे.