तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yuvasetu-mun-and-youth-parliament : यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी यवतमाळमध्ये पहिल्यांदाच दोन दिवसीय शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजराजेश्री बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत कार्यरत ‘युवासेतू’ संघटनेतर्फे ‘युवासेतू मॉडेल युनायटेड नेशन्स (एमयूएन) व यूथ पार्लमेंट 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही दोन दिवसीय परिषद 7 आणि 8 ऑगस्ट रोजी येथील जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात होणार आहे.
‘मॉडेल युनायटेड नेशन्स’ ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीची हुबेहूब प्रतिकृती असते. यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी विविध देशांचे राजदूत, प्रतिनिधी किंवा खासदार म्हणून भूमिका वठवतात. दिलेल्या देशाची धोरणे समजून घेऊन, सखोल संशोधन करून ते जागतिक विषयांवर वादविवाद, वाटाघाटी आणि ठराव मांडतात. यामुळे विद्यार्थ्यांना मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
या दोन दिवशीय परिषदेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सात समित्यांच्या माध्यमातून आपले वक्तृत्व व तर्कशास्त्र मांडता येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा व जागतिक राजकारणावर चर्चेसाठी ‘युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कॉन्सिल्स’ ही समिती असेल, ज्यामध्ये अमेरिका, भारत, रशिया, चीन व फ्रान्स यांसारख्या देशांचे प्रतिनिधित्व विद्यार्थ्यांना करता येईल.
अफगाणिस्तानातील महिला व मुलींचे संरक्षण, हक्क आणि सक्षमीकरणावर ‘यूएन वुमेन्स’ समितीमध्ये मंथन होईल, तर सशस्त्र संघर्षाच्या काळात आरोग्य व्यवस्था आणि नागरिकांच्या संरक्षणावर ‘यूएनएचआरसी’ समिती काम करेल. भारतीय संसदेच्या धर्तीवर चालणाèया ‘लोकसभा’ समितीमध्ये ‘नीट परीक्षा पेपरफूट आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता’ या अतिशय महत्त्वाच्या विषयावर वादविवाद रंगणार आहे.
युवा नेतृत्व क्षेत्रातील उदयोन्मुख नाव, कंट्री अॅम्बेसेडर व ग्लोबल युथ अॅम्बेसेडर म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणाèया हीरा राखी देशमुख या उपक्रमाच्या संस्थापक आहेत. विविध परिषदांच्या आयोजनाचा दांडगा अनुभव असणाèया हीरा देशमुख यांनी यवतमाळच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘युवासेतू’ची स्थापना केली आहे.
या परिषदेसाठी इयत्ता आठवीपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी पात्र असून नाममात्र प्रतिनिधी शुल्क आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र, डेलिगेट किट, दोन्ही दिवसांचा चहा, नाश्ता व भोजन ही व्यवस्था करण्यात आली असून उत्कृष्ट कामगिरी करणाèया विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.