पेशावर
Pakistan Blast पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून एका स्थानिक नेत्याने थोडक्यात बचाव केला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील अस्थिर खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील सलारजई तहसीलमधील ताली बांध परिसरात हा स्फोट झाला. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख बाजौर जिल्ह्यातील रहिवासी सुलेमान कारी आणि गुलाम अशी पटली असून, दोघांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी खार रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
या स्फोटात एक स्थानिक नेता थोडक्यात बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून, स्फोटाचे कारण आणि त्यामागील संभाव्य कटाचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.गेल्या काही वर्षांपासून उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत सातत्याने हिंसाचाराच्या घटनांनी ग्रासला आहे. उग्रवादी कारवाया, अफगाणिस्तानातून सीमापार होणारी दहशतवाद्यांची Pakistan Blast घुसखोरी आणि वारंवार राबविण्यात येणाऱ्या लष्करी मोहिमांमुळे या भागात अस्थिरता कायम आहे. पाकिस्तानच्या संघीय सरकारचा आरोप आहे की, बंदी घालण्यात आलेल्या 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने नोव्हेंबर २०२२ मध्ये शस्त्रसंधी संपुष्टात आल्यानंतर अफगाणिस्तानलगतच्या प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरू ठेवली आहे.
याआधी २४ जुलै रोजीही खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर धडकविण्यात आले होते. या भीषण स्फोटात १५ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये १२ सैनिक, दोन पोलिस कर्मचारी आणि वन विभागातील एका माजी सरकारी अधिकाऱ्याचा समावेश होता.