'मन की बात’मधून भारताच्या सामर्थ्याचा गौरव

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
pm narendra modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’च्या 136व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कारगिल विजय दिवस, भारताची वाढती तांत्रिक क्षमता, जलसंवर्धन, क्रीडा क्षेत्रातील यश, अंतराळ क्षेत्रातील प्रगती, विज्ञानातील विद्यार्थ्यांची कामगिरी तसेच देशभरातील विविध प्रेरणादायी उपक्रमांचा उल्लेख करत नागरिकांना विविध मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
 

pm narendra modi mann ki baat 136th episode highlights: kargil vijay diwas, technology and india’s achievements 
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या आयुष्यात काही तारखा अशा असतात, ज्या लक्षात ठेवण्यासाठी दिनदर्शिकेची गरज भासत नाही. 26 जुलै ही अशीच एक तारीख आहे. आज कारगिल विजय दिवस असून हा दिवस प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकतो आणि देशाच्या वीर जवानांच्या अद्भुत शौर्याची आठवण करून देतो. कारगिलच्या उंच पर्वतरांगा, प्रतिकूल हवामान आणि शत्रूची आव्हाने अशा प्रत्येक परिस्थितीत भारतीय सैनिकांनी अदम्य धैर्य दाखवले. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. या कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी सर्व वीर शहीद आणि वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारत आपल्या तांत्रिक क्षमतेत सातत्याने वाढ करत असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी भारतीय नौदलातील INS महेंद्रगिरीच्या समावेशाचा उल्लेख केला. हा आधुनिक युद्धनौका भारतातच डिझाइन करण्यात आला असून त्याची निर्मितीही देशातच झाली आहे. या जहाजात 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. हे आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) Pinaka Long Range Guided Rocket ची यशस्वी चाचणी घेतली असून त्यामागे वैज्ञानिक आणि अभियंत्यांचे सामूहिक परिश्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन-तीन दिवसांपूर्वी DRDO ने कुशा क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी केली. संरक्षण उत्पादन, संरक्षण निर्यात आणि मित्रदेशांशी राजनैतिक सहकार्य या सर्व क्षेत्रांत भारत नव्या उंचीवर जात असल्याचे त्यांनी सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशिया दौऱ्यात ब्रह्मोस आणि अस्त्र क्षेपणास्त्रांसाठी मोठा करार झाल्याचेही त्यांनी नमूद केले. जगाचा विश्वास भारतीय संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानावर वाढत असल्याचे ते म्हणाले.
 
 
‘मन की बात’च्या मागील भागात केलेल्या ‘कॅच द रेन’च्या आवाहनाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी पावसाचे पाणी साठवण्यावर भर दिला. “पाऊस पडला की पाणी तेथेच साठवा,” हा या मोहिमेचा साधा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. 4 जुलैपासून देशभरात विशेष अभियान सुरू असून त्याअंतर्गत पावसाच्या पाण्याचे संधारण, भूजल पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला गती दिली जात आहे. गावांपासून शहरांपर्यंत, पंचायतांपासून सामाजिक संस्थांपर्यंत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येकाने आपल्या परिसरातील एखादा तलाव, विहीर किंवा बावडी यांची जबाबदारी स्वीकारावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा, असे आवाहन त्यांनी केले. आज वाचवलेला प्रत्येक थेंब भविष्यातील पिढ्यांसाठी मोठी संपत्ती ठरेल, असे ते म्हणाले.
 
 
क्रीडा क्षेत्रातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करताना पंतप्रधानांनी अलीकडे सुरू झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सचा उल्लेख केला. भारतीय युवकांनी अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात अनेक उल्लेखनीय यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. पी. व्ही. सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान ओपनचे विजेतेपद मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या असून त्यांच्या यशाचा देशाला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय महिला क्रिकेट संघाने लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर पहिला कसोटी सामना जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
काही छोटे प्रयत्नही मोठे परिवर्तन घडवू शकतात, असे सांगताना पंतप्रधानांनी केरळमधील एर्नाकुलमच्या दक्षिण चित्तूर येथील एका शाळेतील संस्कृत क्लबचा उल्लेख केला. तेथील प्राध्यापक अभिलाष हे संस्कृत लोकप्रिय करण्यासाठी अनोख्या पद्धतीने काम करत असून या उपक्रमाला ‘अक्षरकंदुक’ असे नाव देण्यात आले आहे. संस्कृतमधील अक्षरे फुटबॉलमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांशी जोडून विद्यार्थ्यांना सोप्या आणि आनंददायी पद्धतीने शिकवले जाते.
अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील रविवारी विक्रम-1च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढला आहे. खासगी क्षेत्राने विकसित केलेले हे भारताचे पहिले रॉकेट असून युवा नवोन्मेषकांनी अशक्य वाटणारी कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी कौशल्य, जिद्द आणि संयमाच्या जोरावर हे यश मिळवले. दीर्घकाळ भारताचे अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी बंद होते, मात्रयुवा हित लक्षात घेऊन ते खुले करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
 
 
विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या यशाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताने मिळवलेल्या पहिल्या क्रमांकाची माहिती दिली. भारतातील पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकली असून गेल्या दशकभरातील प्रत्येक फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळवले आहे. केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्येही सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके मिळवली असून ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. बायोलॉजी ऑलिम्पियाडमध्येही सर्व विद्यार्थ्यांनी पदके जिंकली असून त्यात एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि चार रौप्य पदके मिळवली आहेत.
 
 
काश्मीरच्या पारंपरिक ‘वगू’ चटईचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, कौशल्य आणि काहीतरी करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक मार्ग सुकर होतो. सरकंडे आणि धानाच्या पेंढ्यापासून तयार होणाऱ्या या चटईची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. श्रीनगर येथील गुलाम हुसैन आणि त्यांची कन्या तंजीला यांनी ‘वगू’ हस्तकलेला नवे जीवन देण्याचा संकल्प केला आहे.
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील महिलांच्या स्वयं-सहायता गटाने तयार केलेल्या ‘विदुर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी’चाही पंतप्रधानांनी गौरव केला. लेमनग्रास, गिलोय, ज्येष्ठमध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार होणाऱ्या या चहाने अल्पावधीतच विशेष ओळख निर्माण केली आहे. केवळ एक लाख रुपयांच्या प्रारंभिक प्रयत्नातून सुरू झालेला हा उपक्रम आज देशातील मोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. स्थानिक ज्ञान, निसर्ग आणि महिलांचा आत्मविश्वास एकत्र आल्यास छोटा प्रयत्नही मोठ्या बदलाची सुरुवात करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
‘एक पेड़ मां के नाम’ या अभियानांतर्गत अहमदाबादमध्ये झालेल्या जनसहभागाचेही त्यांनी कौतुक केले. भाडज परिसरात एका तासात साडेतीन लाखांहून अधिक रोपे लावण्यात आली असून त्यासाठी 25 हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले. शालेय विद्यार्थी, NCC कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. भविष्यात ही रोपे घनदाट शहरी जंगलाचे रूप घेतील. या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. गुजरातमधील गिर जंगलात सुमारे 60 वर्षांनंतर इंडियन ग्रे हॉर्नबिल पक्ष्याने पुन्हा अधिवास निर्माण केला आहे. हा गिरमधील दीर्घकाळ सुरू असलेल्या संरक्षण आणि पुनर्स्थापना प्रयत्नांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. हॉर्नबिलला जंगलांचा शेतकरी म्हटले जाते, कारण तो फळे खातो आणि त्यांच्या बिया दूरवर पोहोचवतो, ज्यामुळे नवीन झाडांची वाढ होते.
 
 
प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक पर्यावरणासमोरील मोठी समस्या असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी सिंगल-यूज प्लास्टिकच्या योग्य विल्हेवाटीचे महत्त्व अधोरेखित केले. बिहारमधील सीतामढी येथे ‘वेस्ट टू वेल्थ’चे उत्कृष्ट उदाहरण समोर आले असून तेथे कचऱ्याचे पुनर्वापर करून आकर्षक बाक तयार केले जात आहेत. एका बाकासाठी सुमारे 40 किलो सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर होतो. हे बाक मजबूत, टिकाऊ, आरामदायी आणि पर्यावरणपूरक असून ते सरकारी शाळा, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आले आहेत. यामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढत आहे.
मणिपूरमधील डॉ. रोनाल्डो लैश्राम यांच्या संशोधनाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते जपानमध्ये कार्यरत असलेले खगोलभौतिकशास्त्रज्ञ असून युवा आकाशगंगांच्या विशाल समूहाचा शोध घेणाऱ्या पथकाचा भाग राहिले आहेत. या समूहाला त्यांनी मणिपूरच्या सुंदर लोकटक सरोवराच्या नावावरून ‘लोकटक प्रोटो-क्लस्टर’ असे नाव दिले आहे. लोकटक सरोवरातील तरंगणाऱ्या फुमदींचे अनोखे दृश्य आणि विश्वातील या युवा आकाशगंगांच्या समूहातील साम्य त्यांनी स्पष्ट केले. आज मणिपूरचे लोकटक सरोवर केवळ देशाच्या नकाशावरच नव्हे, तर विशाल ब्रह्मांडातही आपली ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हातमाग आणि हस्तकलेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, हातमागावर तयार होणारा प्रत्येक पोशाख एखाद्या प्रदेशाची, समुदायाची आणि त्यामागे असलेल्या असंख्य लोकांच्या कष्टांची कथा सांगतो. भारताची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या विणकरांचा सन्मान करण्याचे आणि ‘व्होकल फॉर लोकल’ची भावना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्रिपुरातील आदिवासी समुदायांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘चौंगप्रंग’ या वाद्याचाही त्यांनी उल्लेख केला. बांबूपासून तयार होणाऱ्या या वाद्याला तीन तारा असून त्यातून सरोदासारखी मधुर धून निर्माण होते. काही कारणांमुळे तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होत असताना सूरज कुमार देबबर्मा यांनी हे वाद्य पुन्हा लोकप्रिय करण्याचा संकल्प केला असून त्यांचे प्रयत्न आता यशस्वी होत आहेत.
संवादाच्या अखेरीस पंतप्रधान मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उल्लेख केला. मागील काही वर्षांत या अभियानाने संपूर्ण देशाला एका भावनेने जोडले असल्याचे सांगत यंदाही प्रत्येकाने उत्साहाने या मोहिमेत सहभागी व्हावे आणि आपल्या घरावर संपूर्ण सन्मानाने तिरंगा फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले.