चंद्रपूर,
dnr-travels : अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून रामनगर पोलिसांकडून रविवारी नागपूर-हैद्राबाद चालणार्या ‘डिएनआर’ बसची श्वान पथकाच्या मदतीने बारकाईने झडती घेण्यात आली. या कारवाईमुळे शहर व परिसरात बेकायदेशीर तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना नागपूर-हैदराबाद मार्गावर धावणार्या डीएनआर ट्रॅव्हल्स बसमधून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना अवगत केले आणि कारवाईसाठी आवश्यक मंजुरी प्राप्त केली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक हनुमान उगले, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी, शासकीय पंच, छायाचित्रकार व दोन प्रशिक्षित श्वान यांच्यासह विशेष पथक कारवाईसाठी रवाना झाले. ही ट्रॅव्हल्स चंद्रपूर हद्दीत दाखल होताच पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पंचांसमक्ष आणि श्वानांच्या मदतीने वाहनाची कसून झडती घेतली. तथापि, माहितीनुसार वाहनात कोणताही संशयास्पद माल किंवा अमली पदार्थ आढळून आले नाही. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पुढील नोंद केली आहे.
आंतरजिल्हा तसेच आंतरराज्यीय मार्गांवर धावणार्या सर्व खासगी ट्रॅव्हल्स आणि संशयित वाहनांवर यापुढे पोलिसांचे बारीक लक्ष असणार असून, अशी कोणतीही बेकायदेशीर वाहतूक आढळल्यास कठोर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे. नागरिकांना किंवा प्रवाशांना अशा प्रकारच्या अवैध किंवा संशयास्पद हालचालींबाबत काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी रामनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एकुरके यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे व हनुमान उगले. पोलीस उपनिरीक्षक कष्णा दराडे. सहायक फौजदार प्रकाश बल्बी, अंमलदार आनंद खरात, बाबा नैताम आदींनी केली.