कोकण
Railways Approves कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सावंतवाडी रोड स्थानकावर आता राजधानी एक्स्प्रेससह तीन प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नियमित थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
यासोबतच मध्य रेल्वेने गणेशोत्सव 2026 साठी विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांची घोषणा केली आहे. 24 जुलै रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सावंतवाडी रोड स्थानकावर मंजूर करण्यात आलेल्या नव्या थांब्यांमध्ये सीएसएमटी-मंगळुरू एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस आणि एलटीटी-त्रिवेंद्रम गरीब रथ एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
गाडी क्रमांक 12133 सीएसएमटी ते मंगळुरू एक्स्प्रेस सावंतवाडी रोड स्थानकावर सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी पोहोचेल आणि 7 वाजून 4 मिनिटांनी रवाना होईल. तर गाडी क्रमांक 12134 मंगळुरू ते सीएसएमटी एक्स्प्रेस रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सावंतवाडीला येऊन 11 वाजून 32 मिनिटांनी सुटेल. हा थांबा 27 जुलैपासून लागू होणार आहे.
हजरत निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम Railways Approves राजधानी एक्स्प्रेसला आठवड्यातून तीन दिवस सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मिळणार आहे. गाडी क्रमांक 12432 निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस 26 जुलैपासून सकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी सावंतवाडीत पोहोचून 6 वाजून 20 मिनिटांनी रवाना होईल. तर गाडी क्रमांक 12431 तिरुवनंतपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस 28 जुलैपासून सकाळी 9 वाजून 44 मिनिटांनी येऊन 9 वाजून 46 मिनिटांनी सुटेल.
एलटीटी ते त्रिवेंद्रम गरीब रथ एक्स्प्रेसलाही आठवड्यातून दोन दिवस सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 12201 एलटीटी-त्रिवेंद्रम गरीब रथ एक्स्प्रेस 27 जुलैपासून पहाटे 2 वाजून 2 मिनिटांनी सावंतवाडीत पोहोचून 2 वाजून 4 मिनिटांनी रवाना होईल. तर गाडी क्रमांक 12202 त्रिवेंद्रम-एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस 30 जुलैपासून पहाटे 3 वाजून 28 मिनिटांनी येऊन 3 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण प्रवाशांसाठी विशेष गाड्यांचीही घोषणा केली आहे. सीएसएमटी-सावंतवाडी-सीएसएमटी दैनिक स्पेशल गाडी क्रमांक 01031/01032 ही 1 ते 27 सप्टेंबरदरम्यान 16 फेऱ्या धावणार आहे. ही गाडी सीएसएमटीहून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी दैनिक स्पेशल गाडी क्रमांक 01071/01072 ही 1 ते 28 सप्टेंबरदरम्यान 17 फेऱ्या करणार आहे. ही गाडी एलटीटीहून सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सुटून रात्री 9 वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
याशिवाय दिवा-खेड-दिवा मेमू स्पेशल (01155/01156) ही 1 ते 27 सप्टेंबरदरम्यान 16 फेऱ्या धावणार असून, दिवा येथून सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुटून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी खेड येथे पोहोचेल.
पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक स्पेशल (09445/09446) ही 12 ते 26 सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. ही गाडी पुण्याहून मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सुटून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी रत्नागिरी येथे पोहोचेल.
दिवा-चिपळूण-दिवा स्पेशल (01133/01134) ही 1 ते 28 सप्टेंबरदरम्यान 15 फेऱ्या करणार असून, दिवा येथून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे. यासोबतच एलटीटी ते मडगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी मार्गावरही साप्ताहिक व द्विसाप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, सावंतवाडी रोड स्थानकाचे महत्त्वही आणखी वाढणार आहे.