कारंजा लाड,
rajabhau-dongaonkar : सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेत कारंजा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ डोणगावकर यांना प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘विदर्भ रत्न’ पुरस्कारानिमित्त श्री दिगंबर जैन महासमिती, कारंजा संभाग तसेच वाशीम जिल्हा दिगंबर जैन महासमितीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

रिसील डाट इन संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींना दरवर्षी ‘विदर्भ रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेत जैन समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व तसेच दिगंबर जैन महासमिती, वाशीम जिल्ह्याचे व कारंजा संभागाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ डोणगावकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नागपूर येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, शिल्ड आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर कारंजा येथे आयोजित सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना राजाभाऊ डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली कारंजा नागरी सहकारी पतसंस्थेने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे सांगितले. समाजहित, आर्थिक सक्षमीकरण आणि सेवाभावी कार्यातील त्यांच्या मोलाच्या योगदानामुळेच त्यांना हा सन्मान प्राप्त झाल्याचे वत्यांनी नमूद केले.
यावेळी दिगंबर जैन महासमितीचे प्रदेश उपाध्यक्ष आशुतोष जोहरापुरकर, प्रदेश सदस्य नितीन बुरसे, प्रकाश सरोदे, अमोल काळे, वंदना मोहाळे, वाशीम जिल्हा महिला प्रकोष्ठाच्या सहमंत्री शुभांगी मरळे, जिल्हा सदस्य मनीष भेलांडे, संभागाचे अध्यक्ष संदेश जिंतुरकर, सचिव कविश गहाणकरी, रितेश मिश्रीकोटकर, कीर्तीचंद्र मोहाळे, सौरभ डोळस, गिरीश मिश्रीकोटकर, गुंजन जिंतुरकर, रुपल गहाणकरी आणि अमृता जोहरापुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदेश जिंतुरकर यांनी केले.