नवी दिल्ली
Heavy Rain देशातील अनेक भागांत रविवारीही मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या पश्चिम बंगाल किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अनेक राज्यांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशातील सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर राजस्थानातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणा आणि पंजाबमध्येही रविवारी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ओडिशामध्ये कटक, जगतसिंहपूर, केंद्रापाडा, भद्रक, जाजपूर आणि क्योंझर या सहा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कटक, क्योंझर, ढेंकानाल आणि अंगुल जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर पुरीसह अन्य १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागांत भूस्खलन, तसेच सखल भागांत अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
भुवनेश्वर हवामान केंद्राच्या संचालिका मनोरमा मोहंती यांनी पुढील २४ तासांत काही भागांत अतिमुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
राजस्थानातील जालोर आणि सिरोही जिल्ह्यांसाठी रविवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीकानेर, अजमेर, कोटा, जयपूर आणि भरतपूर विभागातील काही भागांतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, २७ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय राहील. त्यानंतर २८ जुलैपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हिमाचल प्रदेशात शनिवारी झालेल्या Heavy Rain मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे १३४ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. दरम्यान, २८ ते ३० जुलैदरम्यान राज्यातील चार जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमला येथील हवामान केंद्राने रविवारी सकाळपर्यंत चंबा, कांगडा, किन्नौर, कुल्लू, मंडी, शिमला आणि सिरमौर जिल्ह्यांतील काही भागांत अचानक पूर येण्याचा इशाराही दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ जुलै रोजी पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद परिसरातही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.