रशिया
Russia Ukraine War रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला चार वर्षांनंतरही विराम मिळालेला नाही. दोन्ही देशांकडून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले असून अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या ताज्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे.
रशियाच्या माहितीनुसार, शनिवारी रशियाच्या ताब्यात असलेल्या जपोरिज्जिया प्रदेशातील एका हॉलिडे कॅम्पवर युक्रेनने हल्ला केला. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये चार मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत 19 जण जखमी झाले आहेत. क्रेमलिनने नियुक्त केलेले जपोरिज्जिया प्रदेशाचे प्रमुख येवगेनी बालित्स्की यांनी दावा केला की, कीवने या भागातील एका रेस्टॉरंटला लक्ष्य केले होते. मात्र, या आरोपांवर युक्रेनकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, युक्रेनच्या उत्तर-पूर्व भागात रशियाने ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याआधी शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीवजवळ रशियाने जोरदार हल्ला केला होता. या हल्ल्यात किमान 10 जण ठार झाले असून 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे.
युक्रेनने रशियन सैन्याची आगेकूच रोखल्याचा दावा केला आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या दिशेने पुढे सरकत असताना युक्रेनने ड्रोनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हल्ले केले. कीवने रशियाच्या हालचाली आधीच ओळखून सैन्याच्या तळांवर हल्ले केल्याने रशियन सैन्याची रसद व्यवस्था विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे रशियन सैनिकांच्या हालचालींवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेन्स्की हे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, युक्रेनने ड्रोन लपवलेल्या ठिकाणांना लक्ष्य करून रशियाने हल्ले केले. दक्षिण-पूर्व युक्रेनमधील जपोरिज्जिया येथील एका शॉपिंग सेंटरवर रशियन ड्रोन हल्ला झाल्याचे सांगण्यात आले असून या हल्ल्यानंतर तेथे आग लागली. या घटनेत काही नागरिक जखमी झाले.
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की Russia Ukraine War यांनी शुक्रवारी महत्त्वाची प्रतिक्रिया देताना गुप्त माहितीनुसार रशिया लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची शक्यता व्यक्त केली. पुढील 48 तासांत रशियाकडून मोठा क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मंगळवारी वॉशिंग्टन येथे भेट होणार आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या अधिकृत कार्यक्रमाच्या यादीत या भेटीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, कीवकडून या भेटीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी जगभरातून आवाहने होत असतानाच दोन्ही देशांकडून पुन्हा एकदा ताजे हल्ले सुरू झाले आहेत. त्यामुळे या संघर्षाचा पुढील टप्पा किती गंभीर स्वरूप धारण करेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.