कारगिलच्या युद्ध गाथेतून युवकांना देशभक्तीची प्रेरणा : तडस

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
देवळी,
ramdas-tadas : आज देशाला शिस्तबद्ध, साहसी, देशाकरिता काहीतरी करण्याची इच्छा असणार्या तरुण-तरुणींची नितांत गरज आहे. या दृष्टिकोनातून राष्ट्रीय छात्र सेना सैनिकी प्रशिक्षण तथा विविध सामाजिक उपक्रम राबवून एक चांगली युवा फळी निर्माण करत आहे. कारगिलच्या शौर्यगाथेतून भावी पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
 
 

kl 
 
 
 
कारगिल विजय दिवसानिमित्त २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा अंतर्गत स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील एनसीसी युनिटच्या वतीने आयोजित कारगिल विजय दिवसानिमित्त २६ रोजी स्थानिक शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटक म्हणून २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे प्रशासकीय अधिकारी कर्नल राजकुमार सामनंदा उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक मोहन अग्रवाल, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, नगरसेवक रवींद्र कारोटकर, प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे, उपसरपंच सौरभ कडू, नगरसेवक शुभांगी कुर्जेकर, पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभियेळ, सचिन घोडे, उज्वला घोडे, नायब सुभेदार नीरज सिंग व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
कारगिल दिनाच्या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे परमवीर तथा महावीर चक्रने सन्मानित कारगिलच्या युद्धातील १३ योद्धांवर कथा नाट्य छात्र सैनिकांनी सादर केले. याप्रसंगी युद्धातील सैनिक या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात साक्षी परिसे, वैष्णवी भोयर व श्रुती हिंगे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर वैष्णवी पिसे, दिव्या आडे, वेदांती चौके व अश्विनी कर्णके यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
 
याप्रसंगी कॅप्टन मोहन गुजरकर द्वारा लिखित मै कारगिल का वीर हू या कथा नाट्य मध्ये कारगिलच्या युद्धातील शहीद कॅप्टन सौरभ कालिया, मेजर विवेक गुप्ता, मेजर राजसिंह अधिकारी, मेजर सोनम वांगचुक, कर्नल बलवान सिंग, कॅप्टन अनुज नैयर, कॅप्टन निकेझाकू केंगुरूसे, नायक दिगेंद्र कुमार, कॅप्टन मनोज कुमार पांडे, रायफल मॅन संजय कुमार, कॅप्टन विक्रम बत्रा, ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव, फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या शौर्य गाथेवर नाटिका सादर करण्यात आली. कर्नल राजकुमार सामनंदा, मोहन अग्रवाल, प्रदीप दाते यांनी मार्गदर्शन केले.
 
प्रस्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले. संचालन अंडर ऑफिसर कोमल शितळे व आरती मरघडे यांनी तर आभार प्राध्यापक जगदीश यावले यांनी मानले.