सालेकसाच्या मुरकुटडोह-दंडारी परिसरात मलेरियाचा ‘उद्रेक’

- पाच गावांत 45 हून अधिक बाधित ः 28 रुग्णांची नोंद

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
malaria : सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत अतिदुर्गम मुरकुटडोह-दंडारी परिसरात मलेरियाने गंभीर स्वरूप धारण केले असून मुरकुटडोह-1, मुरकुटडोह-2, मुरकुटडोह-3, दंडारी आणि टेकाटोला या पाच गावांमध्ये 45 हून अधिक नागरिक मलेरियाने बाधित झाल्याची माहिती स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नोंदीत केवळ 28 रुग्णांची नोंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
 
 
malaria
 
 
येथील गावकर्‍यांच्या मते रविवारी दोन आशा सेविकांनी दिवसभर घरोघरी जाऊन रक्तनमुने संकलित केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी किंवा इतर आरोग्य कर्मचार्‍यांची कोणतीही प्रत्यक्ष हालचाल परिसरात दिसून आली नसून मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण पुढे करून दुर्गम आदिवासी भागाकडे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे. दरम्यान, सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात मलेरियाच्या रुग्णांना भर्ती करण्यात आले असता ही संख्या दहावर पोहोचली आहे. दरम्यान, कोपालगड येथील 29 वर्षीय सुभाष परते यांना 23 जुलै रोजी केटीएस रुग्णालय, गोंदिया येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये निशा मडावी, शैलेश उईके, रुषिका सिरसाम, मयूर भोयर, विशाल टेकाम, निखिल पंधरे, प्रणिता वरखडे, सरिता मच्छिरके आणि प्रतिमा मडावी यांचा समावेश असून एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
 
 
सी-60 जवानही बधित
 
 
मलेरियाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मुरकुटडोह येथील सी-60 जवान पांडूरंग शेतोड यांनाही मलेरियाची लागण झाली आहे. त्यामुळे येथील पोलिस कॅम्पमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलिस अधिकार्‍यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे तपासणी शिबिर आयोजित करण्यासाठी दोन वेळा पत्रव्यवहार केला. तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिबिराची मागणी केली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
छत्तीसगड मधून आलेले रुग्ण
 
 
सर्व रुग्ण छत्तीसगड येथे धान रोवणीच्या कामाला जात असून तिथून परत येणारे रुग्ण बाधित आढळत आहे. आपल्याकडे उद्रेक झालेला नाही. दरम्यान, आरोग्य विभागातर्फे 25 जणांचा पथक या भागात तैनात करण्यात आला असून घरोघरी जाऊन रक्ताचे नमूने घेतले जात आहेत.
- अभिजित गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया