सोनू सूदच्या घरात सहा फुटांचा धामण साप

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
मुंबई
sonu sood मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता सोनू सूद यांच्या निवासस्थानी शनिवारी दुपारी एक अनपेक्षित घटना घडली. त्यांच्या घराच्या परिसरात साप आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापाचे सुरक्षित रेस्क्यू केले.
 

snake found at sonu sood juhu residence, six feet rat snake rescued safely 
शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास सर्पमित्र विक्की दुबे यांना सोनू सूद यांच्या जुहू येथील घरात साप आढळल्याचा कॉल आला. माहिती मिळताच त्यांनी वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड तसेच मुंबई रेंज कंट्रोल ऑफिस, ठाणे यांना याबाबत कळवले आणि तातडीने घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पाहणी केली असता, पावसामुळे पडलेल्या नारळाच्या पानांखाली सुमारे सहा फूट लांबीचा धामण जातीचा साप लपून बसल्याचे आढळून आले. हा साप बिनविषारी असल्याचे स्पष्ट झाले. सर्पमित्रांनी अत्यंत सावधगिरीने सापाला पकडून सुरक्षितरीत्या बाहेर काढले.यावेळी उपस्थित नागरिकांना धामण सापाबाबत माहिती देण्यात आली. हा साप विषारी नसून नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.दरम्यान, पावसाळ्यात सापांच्या अधिवासात पाणी शिरल्यामुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर येण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.घर किंवा परिसरात साप आढळल्यास नागरिकांनी त्याला मारण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी वन विभागाच्या 1926 या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधून सापाचे सुरक्षित रेस्क्यू करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.