भारताचा झिम्बाब्वेवर ‘क्लीन स्वीप’ वार!

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
हरारे,
ind-vs-zim : जिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात भारतीय संघाने ३५ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची ही मालिका ३-० अशी खणखणीत जिंकली आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने सर्वच क्षेत्रांत चमकदार कामगिरी करत जिम्बाब्वेला पराभवाचा धक्का दिला.
 
 
ind-vs-zim
 
 
 
वैभव सूर्यवंशीची तुफानी फलंदाजी
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १९२ धावांचा डोंगर उभारला. भारताच्या या मोठ्या धावसंख्येत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने मोलाचे योगदान दिले. त्याने अवघ्या ४९ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची स्फोटक खेळी केली. याशिवाय इशान किशन याने २९ धावा, कर्णधार श्रेयस अय्यर याने २७ धावा आणि रिंकू सिंग याने २५ धावांचे योगदान दिले.
 
गोलंदाजांचा प्रभावी मारा
 
१९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जिम्बाब्वेचा संघ निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून जलद गोलंदाज मयंक यादवने अप्रतिम गोलंदाजी करत ३ बळी टिपले, तर यश ठाकूरने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
 
मालिका भारताच्या नावे
 
याआधी खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे ७ गडी आणि ९० धावांनी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामना जिंकून या मालिकेत जिम्बाब्वेचा पूर्णपणे सफाया केला. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा एकतर्फी आणि ऐतिहासिक विजय ठरला आहे.