वॉशिंग्टन
Trump कॅनडाच्या जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचा परिणाम अमेरिकेतील अनेक शहरांच्या हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर निशाणा साधला असून, टॅरिफ लावण्याची धमकीही दिली आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर एक AI-निर्मित चित्र शेअर केले असून, त्यातून कॅनडाच्या जंगलातील आगीचा धूर अमेरिकेत पोहोचत असल्याबद्दल त्यांनी टीका आणखी तीव्र केली आहे.
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या या AI चित्रात अमेरिका-कॅनडा सीमेवर एक भव्य ‘एअर फिल्ट्रेशन बॅरियर’ म्हणजेच हवा शुद्ध करणारी मोठी भिंत दाखवण्यात आली आहे. या भिंतीवर “नॉर्थ अमेरिका - एअर फिल्टर बॅरियर - स्वच्छ हवा, स्वच्छ सीमा” असा संदेश लिहिलेला दिसत आहे. कॅनडातील जंगलांमधून निघणारा धूर सीमापार अमेरिकेत येत असल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी ही पोस्ट केली आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडावर आरोप केला होता की, ओटावा सरकार प्रदूषित हवा अमेरिकेच्या दिशेने येण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही. त्यानंतर त्यांनी कॅनडावर टॅरिफ लावण्याचा इशाराही दिला होता.
दरम्यान, ‘एअर फोर्स वन’मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी या विषयावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी चर्चा केली आहे. कॅनडाने जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न अधिक वेगाने करावेत, अशी मागणी त्यांनी केली. ट्रम्प म्हणाले, “ही चर्चा चांगली झाली. मात्र मी त्यांना सांगितले की, या आगींमुळे आमची हवा विषारी होण्यापासून तुम्हाला रोखावे लागेल. आमची हवा विषारी झाली आहे.”
अमेरिका कॅनडाला जंगलातील आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, धुरामुळे अमेरिकेला झालेल्या त्रासासाठी कॅनडाने आर्थिक भरपाई द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. ते म्हणाले, “जर आम्ही त्यांना मदत करू शकत असू, तर नक्की करू. पण कदाचित त्यांनी आम्हाला काही भरपाई द्यायला हवी किंवा त्याऐवजी आम्ही काही टॅरिफ लावायला हवेत.”
ट्रम्प यांनी पुढे दावा केला की, कॅनडाच्या जंगलातील आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचा परिणाम अमेरिकेतील काही भागांवर, विशेषतः मिशिगनमध्ये झाला आहे. खराब हवेच्या गुणवत्तेमुळे काही कारखाने आणि कार्यस्थळांवरील कामकाज काही काळासाठी थांबवावे लागल्याचा दावाही त्यांनी केला.