मानोरा,
soybean-crops-turn-yellow : तालुक्यातील भुली या गावातील शेतशिवारात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जवळपास ६ एकर वरील सोयाबीन पिके पिवळी पडून करपत चालल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतातील सोयाबीनच्या ओळी दिसत आहेत काही ठिकाणी पाने हिरवीगार असली तरी मधोमध अनेक रोपांची पाने पिवळी पडली आहेत, करपली आहेत आणि वाढ खुंटली आहे. जमीन ओली असूनही पिकाची अवस्था चिंताजनक आहे. भुली शिवारातील शेतकरी काजल शाम राठोड आणि बत्तीबाई सरदार राठोड यांच्या वावरात पेरणी केलेल्या सोयाबीनवर हा रोग दिसून आला. पेरणीनंतर सुरुवातीला पिक चांगले आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अचानक पाने पिवळी पडून गळू लागली आहेत. शेतकरी काजल राठोड म्हणाल्या, खूप अपेक्षेने पेरणी केली होती. खत, बी-बियाणे आणि मजुरीसाठी कर्ज काढले. आता पीकच वाचत नसेल तर पुढे काय करायचे? हा रोग नेमका कशामुळे झाला हे कळत नाही.
या अज्ञात रोगामुळे इतर शेतकर्यांमध्येही दहशत पसरली आहे. रोगाचा प्रसार संपूर्ण गावात होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकर्यांनी तालुका आणि जिल्हा कृषी विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने शेतात येऊन पाहणी करावी, रोगाचे निदान करून उपाययोजना सांगाव्यात, अशी मागणी केली आहे. कृषी तज्ञांच्या मते, पाण्याचा निचरा न होणे किंवा बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन पिवळे पडण्याची शयता असते. मात्र नेमके कारण प्रयोगशाळा तपासणीनंतरच कळेल. पिक वाचवण्यासाठी तातडीने उपाय न केल्यास तालुयातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी भुली व परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.