राष्ट्रसेविका समितीच्या ‘आभा’ हस्तलिखिताचे विमोचन

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
abha-manuscript : राष्ट्रसेविका समितीच्या ‘आभा’ या हस्तलिखिताचा विमोचन सोहळा येथील तेजस्विनी छात्रावासात थाटात पार पडला. यावेळी भजनाच्या तालात ‘आभा’ची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर विमोचन सोहळ्यात पूर्व प्रांत कार्यवाहिका सुलभा गौड, प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले, वैजयंती वडनेरकर व वृषाली मानेकर यांनी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन केले. वैजयंती रिसालदार यांच्या सरस्वती स्तवनानंतर ‘आभा’च्या संपादक वृषाली मानेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी यावर्षीच्या आभासाठी असलेले दोन्ही विषय म्हणजे ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ आणि ‘दाता दुर्लभो भूमी’ या दोन्ही विषयांचा थोडक्यात आढावा घेतला.
 
 
 
y26July-Aabha
 
 
 
जान्हवी डगावकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सुलभा गौड आणि रोहिणी आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन वृषाली मानेकर यांनी व मंगला देशपांडे यांनी वृषाली मानेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ग्रंंथपाल डॉ. राजश्री धर्माधिकारी यांनी आभाच्या अंकाबद्दल मनोगत व्यक्त केले.
 
 
संस्कार भारतीच्या राजश्री कुळकर्णी यांनी आभासाठी विषयानुरूप चित्रे काढून दिली. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘आभा’चे मुखपृष्ठकार, संस्कार भारतीचे कार्यकर्ते अरुण लोणारकर आणि संपूर्ण हस्तलिखिताचे सुरेख अक्षरांत लिखाण करणाèया समृद्धी दाणी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
 
 
या सोहळ्यात सुलभा गौड यांचे शुभेच्छापर भाषण झाले. रोहिणी आठवले यावेळी म्हणाल्या, ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ अशी ज्ञानदेवांनी पसायदानातून विश्वात्मक कल्याणासाठी प्रार्थना केली असली तरी सर्वप्रथम प्रत्येकाने स्वतःमध्ये असलेला वाकडेपणा नाहीसा कसा करता येईल हे बघावे आणि नंतर दुसèयाचे खलत्व नष्ट करण्याचा प्रयत्न करावा.
 
 
जान्हवी डगावकर यांनी आभार मानले. पसायदान आणि प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी ‘आभा’च्या सर्व लेखक, समितीच्या अधिकारी व सेविका उपस्थित होत्या.