हिंसाचार; पोलिसांवर दगडफेक, हवेत गोळीबार, इंटरनेट सेवा बंद

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
सिवान
Violence Erupts विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन तब्बल ३६ दिवसांनी संपुष्टात आले असले, तरी बिहारमध्ये या मुद्द्यावरून तणाव कायम आहे. पटण्यात शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ डाव्या संघटनांनी शनिवारी बिहार बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान राज्यातील अनेक शहरांत आंदोलन झाले, मात्र सर्वाधिक हिंसक घटना सिवान येथे घडली. सिवानसह पटणा, छपरा, औरंगाबाद, सासाराम, भागलपूर, पूर्णिया आणि सीतामढी या जिल्ह्यांतही आंदोलने उग्र झाली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केली, तर काही वाहनांना आग लावण्यात आली.
 

Violence Erupts During Bihar Bandh: Clashes in Siwan Leave 30 Police Personnel Injured 
सिवानमध्ये गांधी मैदानातून सुरू झालेल्या आंदोलनाने काही वेळातच हिंसक वळण घेतले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झाली. या घटनेत सिवानचे पोलिस अधीक्षक पूरण कुमार झा, दोन उपविभागीय पोलिस अधिकारी (डीएसपी) यांच्यासह एकूण ३० पोलिस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच सुमारे १० अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि ६ ते ८ फेऱ्या हवेत गोळीबार करण्यात आला.
हवेत गोळीबार झाल्यानंतर आंदोलकांवर गोळीबार करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर सिवान पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून या वृत्तांचे खंडन केले. पोलिसांनी स्पष्ट केले की, पोलिसांच्या गोळीबारात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. काही जण जखमी झाले असले, तरी पोलिसांनी केवळ अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर केला आणि ६ ते ८ फेऱ्या हवेत गोळीबार केला.
आंदोलकांनी पोलिसांवरViolence Erupts  मोठ्या प्रमाणात दगडफेक करत बॅरिकेड्स तोडले आणि लाठ्या-काठ्यांनीही पोलिसांवर हल्ला केला. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला अश्रुधूराचा वापर केला. त्यानंतर लाठीमार करण्यात आला. आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न करूनही परिस्थिती आणखी चिघळली. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
या हिंसाचारात एसपी पूरण झा, दोन डीएसपी यांच्यासह एकूण ३० पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, पोलिसांच्या कारवाईत अनेक आंदोलकांनाही दुखापत झाली आहे. हिंसाचाराच्या आरोपाखाली अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून, आंदोलनादरम्यान तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओंची तपासणी सुरू आहे. अनेक तास पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष सुरू राहिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सिवान जिल्ह्यात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.