वर्धा,
snake bite घरी रात्री झोपेत असलेल्या १५ वर्षीय मुलीला सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला. भाविका पवन बोरसरे रा. आंजी मोठी, वार्ड ४ असे मृत मुलीचे नाव आहे. ती इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भाविका ही रात्री आपल्या घरी नेहमीप्रमाणे झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ती गाढ झोपेत असताना विषारी सापाने तिच्या पायाला दंश केला. मात्र, झोपेत असल्यामुळे सुरुवातीला तिला या गोष्टीची जाणीव झाली नाही. काही वेळानंतर अचानक जाग आली असता, आपल्याला काहीतरी चावल्याचा संशय आला. तिने तातडीने हा प्रकार घरातील लोकांना सांगितला. कुटुंबीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिची गंभीर अवस्था पाहता पुढील उपचारासाठी तत्काळ वर्धा येथे हलवण्याचा सल्ला डॉटरांनी दिला.
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. भाविका ही इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. अत्यंत लाडया आणि हुश्शार मुलीचा अशा अचानक मृत्यूने गावात शोककळा पसरली.