मालदा,
Adina Masjid or Adinath Temple पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील पांडुआ येथील सुमारे ६५० वर्षे जुनी आदिना मशीद पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. ही वास्तू पूर्वीचे ‘आदिनाथ शिव मंदिर’ असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात येत असून, या दाव्यानंतर परिसरातील वातावरण संवेदनशील बनले आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य शमिक भट्टाचार्जी यांनी अलीकडेच संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर संबंधित वास्तूच्या जीर्णोद्धाराची मागणी हिंदू संघटनांकडून जोर धरू लागली आहे. ‘हिंदू सुरक्षा समिती’ या संघटनेने श्रावण महिन्यातील सोमवारी आदिना मशिदीजवळ भगवान शिवाचा रुद्राभिषेक आणि विशेष पूजा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली आहे.

मालदा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुपम सिंह यांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती दिली. सुमारे ३०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, केंद्रीय दलांचीही मदत घेण्यात आली आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवले जात आहे.या वास्तूच्या धार्मिक स्वरूपावरून निर्माण झालेला वाद सध्या कलकत्ता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने न्यायालयाने सध्याची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हिंदू संघटनांचा दावा आहे की, बंगाल सल्तनतीच्या काळात इ.स. १३६४ ते १३७४ या कालावधीत बांधण्यात आलेल्या या वास्तूमध्ये मंदिर स्थापत्याशी साधर्म्य दाखवणारे काही घटक आढळतात. वास्तूच्या सजावटीत गुलाबाच्या पाकळ्या, भौमितिक रचना, दिव्यांच्या नक्षीबरोबरच चैत्य खिडक्या, साखळ्यांच्या रचना, मंदिरातील घंटांसारखी नक्षी आणि कमळाच्या पाकळ्यांचे नमुने असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. येथे गणेशमूर्ती आणि शिवलिंग असल्याचाही दावा करण्यात आला आहे. आदिना मशीद भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली आहे. दरम्यान, १९९१ च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार धार्मिक स्थळाचे धार्मिक स्वरूप बदलण्यास मनाई आहे. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयीन निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.